१५0 रुपयांसाठी हत्या!
By Admin | Updated: May 8, 2014 02:50 IST2014-05-08T02:33:02+5:302014-05-08T02:50:25+5:30
कोणताही पुरावा नसताना कचरा वेचणाऱ्याच्या हत्येचा अवघ्या दोन दिवसात उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात तहसील पोलिसांनी यश मिळवले

१५0 रुपयांसाठी हत्या!
कचरा वेचणार्याच्या हत्येचा छडा : आरोपी जेरबंद
नागपूर : कोणताही पुरावा नसताना कचरा वेचणार्याच्या हत्येचा अवघ्या दोन दिवसात उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यात तहसील पोलिसांनी यश मिळवले. सुरेश ऊर्फ भुर्या मनराखन शाहू (वय २९, रा. विजय नगर, बाजार चौक, कळमना) आणि प्रमोद ऊर्फ बबलू दामाजी धांडे (वय ३५, रा. मालनी, ता. कुही, जि. नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. केवळ १५0 रुपयांसाठी या दोघांनी कचरा वेचणार्या नीलेश ऊर्फ निल्या काशीनाथ धुंडे (वय २५) याची अमानुष हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावसार मंगल कार्यालयाजवळ ४ मे च्या सकाळी ७.३0 वाजता नीलेशचा मृतदेह आढळला होता. नीलेश मूळचा खापरखेडा, येथील रहिवासी होता. तो कचरा वेचून उदरनिर्वाह करीत होता. तहसील परिसरातच आरोपी सुरेश शाहू आणि प्रमोद धांडे यांच्यासोबत त्याची ओळख झाली. आरोपींना दारू, गांजाचे व्यसन असल्यामुळे अनेकदा व्यसन भागवण्यासाठी ते एकमेकांकडून पैसे उधार घेत होते. नीलेश याच्यासोबतही त्यांचा पैशाचा व्यवहार झाला होता. नीलेशने प्रमोदला ५0 रुपये दिले होते. तर, सुरेशकडून १५0 रुपये उधार घेतले होते. आपले पैसे परत मिळावे म्हणून सुरेशने नीलेशच्या मागे तगादा लावला होता तर, प्रमोद नीलेशचे ५0 रुपये देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. ३ मे च्या रात्री याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. प्रमोदकडून पैसे परत मिळाल्यानंतर तुला तुझे पैसे देईन, असे नीलेशने सुरेशला सांगितले. सुरेशने मात्र आत्ताच पैसे पाहिजे म्हणून अट्टहास मांडला. वाद वाढला आणि आरोपी सुरेश तसेच प्रमोदने नीलेशचा दगडाने ठेचून खून केला. (प्रतिनिधी)