आरपीएफचे सीसीटीव्ही युनिट ठरतेय पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:12+5:302021-07-26T04:08:12+5:30
नागपूर : एकेकाळी सीसीटीव्हीचे फुटेज पाहून २४ आणि २६ सेकंदात चोरांना पकडून रेल्वे सुरक्षा दल लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करीत ...

आरपीएफचे सीसीटीव्ही युनिट ठरतेय पांढरा हत्ती
नागपूर : एकेकाळी सीसीटीव्हीचे फुटेज पाहून २४ आणि २६ सेकंदात चोरांना पकडून रेल्वे सुरक्षा दल लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करीत होते; परंतु आता आरपीएफचे सीसीटीव्ही युनिट पांढरा हत्ती ठरले आहे. एसी रुममध्ये बसून सीसीटीव्हीवरून गुन्हेगारांवर वॉच ठेवण्याची ड्युटी असताना आरपीएफचे जवान काय करतात, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील गुन्हेगारांवर अंकुश लागला होता,परंतु आता परिस्थिती बदलली असून रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील आरक्षण कार्यालयात एक चोरटा सलग दोन दिवस चोरी करून गेल्यानंतरही आरपीएफच्या सीसीटीव्ही युनिटचा त्याचा पत्ता लागत नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर ४.५० कोटी रुपये खर्चून २४० एचडी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे हाय क्वालिटीचे असल्यामुळे नागपूर शहर पोलिसांनीही या कॅमेऱ्याची स्तुती केली आहे; परंतु आता आरपीएफ ठाण्यापासून २०० मीटर दूर असलेल्या आरक्षण कार्यालयाजवळ होणाऱ्या चोऱ्याही सीसीटीव्ही कक्षातील आरपीएफ जवानांना दिसत नाहीत. चोरी झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येते, परंतु पूर्वीसारखे गुन्हेगारांवर लक्ष देण्यात मात्र सीसीटीव्ही युनिट सपशेल अपयशी ठरले आहे. रेल्वेस्थानकावर चोरटे बिनधास्त वावरत आहेत. बहुतांश चोऱ्या प्रवासी असलेल्या भागात घडतात. यात तिकीट काऊंटर, जनरल वेटिंग हॉल, स्लिपर आणि एसी वेटिंग हॉलचा समावेश आहे. या भागात सीसीटीव्हीतील आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष दिल्यास चोरट्यांचा बंदोबस्त करणे सहज शक्य आहे. परंतु केवळ एसीत बसून आराम करण्यात सीसीटीव्ही युनिटमधील कर्मचारी आपला दिवस घालवित असल्याची स्थिती आहे.
.............