आरपीएफ जवान प्रवाशासाठी ठरला विघ्नहर्ता ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:52+5:302021-09-12T04:12:52+5:30
नागपूर : अनेकजण कर्तव्य बजावताना कामचुकारपणा करतात. काम टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु रेल्वे सुरक्षा दलातील एका जवानाने आपला जीव ...

आरपीएफ जवान प्रवाशासाठी ठरला विघ्नहर्ता ()
नागपूर : अनेकजण कर्तव्य बजावताना कामचुकारपणा करतात. काम टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु रेल्वे सुरक्षा दलातील एका जवानाने आपला जीव धोक्यात घालून एका रेल्वे प्रवाशाचा जीव वाचविल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी रात्री ९.३० वाजता रेल्वे सुरक्षा दलाचा जवान मुनेश गौतम हा कर्तव्य बजावत होता. प्लॅटफॉर्मवर तो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फिरत होता. दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वेगाडी क्रमांक ०२१७० आली. ही गाडी रवाना होत असताना एका प्रवाशाने धावत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न केला. ही बाब आरपीएफचा जवान पाहत होता. त्याने जोरात ओरडून त्याला धावत्या गाडीत चढण्यास मनाई केली. परंतु त्या आधीच त्या प्रवाशाचा पाय घसरल्यामुळे तो रेल्वेगाडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या अरुंद जागेत पडला. ही बाब मुनेश गौतमला दिसताच तो लगेच तिकडे धावला. त्याने रेल्वे रुळाच्या बाजूलाच पडलेल्या प्रवाशाला हात देऊन सुरक्षित बाहेर काढले. हा प्रवासी काही सेकंद तेथे पडून असता आणि त्याने हालचाल केली असती तर त्याच्या चिंधड्या उडाल्या असत्या. परंतु मुनेश गौतम याने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे या प्रवाशाचे प्राण वाचले. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी मुनेश गौतमने दाखविलेल्या कर्तबगारीबद्दल त्याचे कौतुक केले आहे.