देवलापारमध्ये सरपंच पदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:16+5:302021-02-06T04:13:16+5:30
देवलापार : रामटेक तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देवलापार ग्रा.पं.चे सरपंच पद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव झाले आहे. देवलापार ग्रा.पं.मध्ये ...

देवलापारमध्ये सरपंच पदासाठी रस्सीखेच
देवलापार : रामटेक तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या देवलापार ग्रा.पं.चे सरपंच पद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी राखीव झाले आहे. देवलापार ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाजवळ बहुमत आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी काँग्रेस समर्थित गटातच रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे आहेत. यात कोण बाजी मारणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. या ग्रामपंचायतीची कार्यकारिणी ही १३ सदस्यीय आहे. त्यात सात महिला आरक्षित गटातून विजयी झाल्या आहेत. त्यापैकी सहा महिला सदस्य या काँग्रेस समर्थित गटाच्या आहेत. शाहिस्ता पठाण या खुल्या प्रवर्गातून आल्याने त्यांची दावेदारी प्रथम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्या अल्पसंख्यक असल्याने देवलापार परिसरात काँग्रेसला याचा फायदा होईल, असा काहींचा तर्क आहे. पंचायत समितीच्या माजी उपसभापती प्रणाली सरोदे या आधी शिवसेनेच्या होत्या. निवडणुकीपूर्वी त्या काँग्रेस समर्थित गटात सामील झाल्या. देवलापार येथे आदिवासी समाज मोठा आहे. यात आदिवासी समाजाचे तीन महिला व तीन पुरुष असे सहा सदस्य ग्रामपंचायतीत आहेत. सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने येथे शिल्पा पेंदाम व सारिका उईके यांचीही दावेदारी राहील. यासोबतच जिल्ह्यात सर्वात कमी वयाची महिला सदस्य असलेल्या मोनिका पोवारे यांच्या गळ्यातही ऐनवेळी सरपंच पदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी याबाबत काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व काय निर्णय घेते, हेही पाहणे गरजेचे आहे.