Roof flap brake systems can provide accident control | 'रुफ फ्लॅप ब्रेक सिस्टीम' ने मिळवू शकतील अपघातावर नियंत्रण

'रुफ फ्लॅप ब्रेक सिस्टीम' ने मिळवू शकतील अपघातावर नियंत्रण

ठळक मुद्देनागपूरच्या युवकाचे संशोधन : सिस्टीमचे मिळविले पेटेंट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते हे विकासाचे द्योतक मानले जातात. गेल्या पाच वर्षात देशभरात रस्त्यांचे जाळे झपाट्याने विणल्या गेले. तेवढ्याच झपाट्याने चारचाकी वाहने वाढली आणि त्याच गतीने अपघातही वाढले. नागपुरातील निखिल उंबरकर हे रस्त्यावरील अपघाताची कारणमीमांसा व उपाययोजनावर संशोधन करीत आहे. हे संशोधन करताना अपघाताची तीव्रता कशी कमी करता येईल, या दृष्टिकोनातून त्यांनी ‘रुफ प्लॅप ब्रेक सिस्टीम’ तयार केली आहे. त्यांनी या यंत्रणेचे पेटेंटही केले असून, त्यांचा दावा आहे की, त्यांच्या या यंत्रणेमुळे हायवेवरील अपघातावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकते.
निखील यांचे स्वत:चे कारचे सर्व्हिस स्टेशन आहे. निखिलच्या मते वाहनांची गती वाढविण्यासाठी कार कंपन्या कमी वजनाचे साहित्य वापरतात. गती, वेग हाच अपघाताचे मुख्य कारण आहे. हायवेवरील अपघाताचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की, वाहनांचा वेग १२०, १४०, १६० पर्यंत असतो. या वेगात वाहन धावत असताना अनवधानाने एखादा अडथळा आला की सपाट्याने ब्रेक मारला जातो. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन एखाद्या वाहनाला धडकते, वाहन रस्त्यावर उलटते आणि मोठा अपघात होतो. वाहन वेगात असताना जोरात ब्रेक मारल्यामुळे वाहनाचा मागचा भाग वर उठतो. टायरची रस्त्यावरची ग्रीप सुटते. वाहन अनियंत्रित होऊन मोठा अपघात होतो. या दृष्टिकोनातून निखिल यांनी स्वत:च्या चार चाकी वाहनाच्या छतावर एक फ्लॅप लावला आहे. हा फ्लॅप १२० च्यावर गाडीचा वेग असताना ब्रेक मारल्यास उघडतो. या फ्लॅपमुळे हवा अडली जाते व हवेचा दाब गाडीवर पडतो, परिणामी गाडीचा वेग कमी होतो. गाडी रस्ता सोडत नाही, टायर रस्त्याला चिपकून असतात. त्यामुळे गाडी अनियंत्रित होत नाही ठराविक अंतरापूर्वीच गाडी थांबते. याचे प्रात्याक्षिक त्यांनी स्वत:च्या गाडीवर केले आहे. त्याच्या मते हे तंत्रज्ञान विमानात वापरले जाते. या यंत्रणेमुळे वाहन चालक वाहन बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवू शकतो.
निखिल यांनी ऑटोमोबाईलमध्ये डिप्लोमा केला आहे. यापूर्वी त्याने ‘फॉर्म्युला वन’ ही कार स्वत: तयार केली होती. तो सध्या वाहनांच्या सेफ्टी फिचरवर काम करतो आहे. फेसबुकवर त्याचे रोड अ‍ॅक्सिडेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट नावाचे पेज आहे. यावर अपघाताची कारणे आणि ते कसे टाळता येईल यावर विश्लेषण करतो.

विमान १४०, १८० च्या वेगाने पंखाच्या आधारे आकाशात उडते. याच टेक्नॉलॉजीचा वापर रुफ फ्लॅप ब्रेकींग सिस्टममध्ये करण्यात आला आहे. याचे पेटेंट केल्यामुळे वाहन कंपन्यांशी यावर चर्चा सुरू आहे.
निखिल उंबरकर, रुफ प्लॅप ब्रेक सिस्टमचे निर्माता

Web Title: Roof flap brake systems can provide accident control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.