सायबर गुन्ह्यात मानसशास्त्राची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:01+5:302021-04-04T04:08:01+5:30
श्रेयस होले नागपूर : कोविड लॉकडाऊननंतर शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर सायबर सेल सायबर गुन्हेगारांविरुद्ध ...

सायबर गुन्ह्यात मानसशास्त्राची भूमिका महत्त्वाची
श्रेयस होले
नागपूर : कोविड लॉकडाऊननंतर शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर सायबर सेल सायबर गुन्हेगारांविरुद्ध सक्रियपणे काम करीत आहे आणि काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टोळ्यांना अलीकडेच पोलिसांनी पकडले आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अशोक बागुल यांनी लोकमतशी चर्चेदरम्यान सायबर गुन्हेगारीत वाढ होण्यामागील काही प्रमुख कारणे आणि ते रोखण्यासाठी काय केले जाऊ शकते, यावर माहिती दिली. नियमित गुन्ह्यांची सायबर गुन्ह्यांशी तुलना करणे चुकीचे ठरेल. माझ्या अभ्यासापर्यंत ९९ टक्के सायबर गुन्हे टाळण्यासारखे असतात. ते लोकांच्या अज्ञानामुळे घडतात. अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, लोक विविध माध्यमे आणि पोलीस खात्यामार्फत सायबर गुन्ह्यांविषयी बरीच माहिती मिळवूनही प्रमाणित नेट बँकिंग प्रोटोकॉल आणि इतर ऑनलाईन सेफ्टीबद्दल स्वत:ला शिक्षित करण्यास तयार नसतात.
बागुल म्हणाले, सायबर गुन्ह्यांमध्ये मानसशास्त्रज्ञ मोठी भूमिका बजावते. केवळ शिक्षित लोकच सायबर गुन्हे करू शकतात. बऱ्याच घटनांमध्ये पीडित लोकही सुशिक्षित असतात. एक सुशिक्षित व्यक्ती विनाकारण गुन्हा करीत नाही. सायबर गुन्हेगार सहसा बळी पडलेल्यांसोबत मानसशास्त्राने खेळतात. ते भीती वा लोभ हत्यार म्हणून वापरतात. ते बऱ्याचदा पीडितांना सांगतात की, त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे जिंकले आहेत किंवा त्यांच्या बँक खात्यात काहीतरी चूक झाली आहे. लोभामुळे किंवा भीतीमुळे लोक कोणाशीही वाद न घालता गंभीर माहिती देतात.
आम्हाला सायबर गुन्हेगारांचे मानसशास्त्रही समजले पाहिजे. लोकांना माहिती नसते; पण सायबर गुन्हेगार मोठ्या संख्येने अल्पवयीन असतात. त्यांना आपण काय करीत आहोत आणि हा एक गंभीर गुन्हा आहे, हेसुद्धा माहीत नसते. कोविड लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेले काही सुशिक्षित तरुण केवळ बेरोजगारीमुळे सायबर गुन्हेगार बनले आहेत. काही गुन्हेगार केवळ लोभासाठी जाणूनबुजून असे गुन्हे करतात. परंतु, आम्ही अल्पवयीन आणि बेरोजगार तरुणांना योग्य समुपदेशन केल्यास सायबर गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात मदत होईल.
बागुल म्हणाले, सायबर सेल सर्व प्रकारच्या सायबर गुन्हेगारी कारवाया थांबविण्यास कटिबद्ध आहे. परंतु जागरूक नागरिकांनी अज्ञात कॉलरसोबत संवेदनशीन माहिती सामायिक करू नये किंवा स्पॅम मेल किंवा संदेशांना उत्तर देऊ नये. हे शक्य झाल्यास सायबर गुन्हेगारीवर आळा येऊ शकेल.