निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे बदलले वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:41+5:302021-09-21T04:10:41+5:30

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड: राज्यातील नगरपालिकांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकाही निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसारच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ...

The role of the Election Commission has changed the environment | निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे बदलले वातावरण

निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळे बदलले वातावरण

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड: राज्यातील नगरपालिकांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकाही निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसारच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने विदर्भातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे नगरपरिषदेत जाण्यास इच्छुक कामास लागले आहे.

राज्यातील नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमास कोरोना संसर्गामुळे राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. स्थगितीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचा निर्वाळा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे पाच जिल्हा परिषदांच्या पोट निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

नरखेड तालुक्यात नरखेड, मोवाड या दोन नगरपालिका आहेत. मोवाड नगरपालिकेची मुदत १७ मे २०२० ला संपली. तेव्हापासून तिथे प्रशासक नेमण्यात आला आहे. नरखेड नगरपालिकेची मुदत ७ फेब्रुवारी २०२२ ला संपणार आहे. या दोन्ही नगरपालिकाच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या अनुषंगाने २० ऑगस्ट रोजी आदेश काढून २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग (वॉर्ड) रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्टपासून तयार करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका आयोगाने घेण्याचे ठरविले तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात याबाबतचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. पाच वर्षांपूर्वी ३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. तर ९ डिसेंबर २०१६ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. तर ८ जानेवारी २०१७ रोजी मतदान झाले होते.

वाॅर्ड पद्धतीमुळे चुरस

मागच्या निवडणुकीत प्रभागमधून दोन-तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. यावेळी एक वॉर्ड-एक सदस्य यापद्धतीने होणार आहे. तसेच नगराध्यक्ष जनतेतून निवडून आले होते. यावेळी सदस्यांतून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी तुल्यबळ लढती होणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

अनेक इच्छुकांनी तर या निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. त्यात गेल्या पाच वर्षात निवडून आल्यानंतर गायब झालेले विद्यमान नगरसेवक पुन्हा प्रभागामध्ये फिरताना दिसून येत आहे. पाच वर्षे विजनवासात असलेले स्थानिक राजकीय नेते, कार्यकर्ते सार्वजनिक कार्यात सक्रिय झाले आहे.

Web Title: The role of the Election Commission has changed the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.