देशभरात ‘रोहित अॅक्ट’ लागू व्हावा
By Admin | Updated: October 13, 2016 06:31 IST2016-10-13T06:31:31+5:302016-10-13T06:31:31+5:30
रोहित वेमुला प्रकरण हे केवळ हैदराबाद विद्यापीठाशी संबंधित नाही. देशातील प्रत्येक विद्यापीठांत विद्यार्थ्यांसोबत असाच भेदभाव सुरू आहे.

देशभरात ‘रोहित अॅक्ट’ लागू व्हावा
नागपूर : रोहित वेमुला प्रकरण हे केवळ हैदराबाद विद्यापीठाशी संबंधित नाही. देशातील प्रत्येक विद्यापीठांत विद्यार्थ्यांसोबत असाच भेदभाव सुरू आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत जाती, धर्म, लिंग असा कुठल्याच प्रकारचा भेदभाव होऊ नये, यासाठी स्वतंत्र कायदा करून त्याला ‘रोहित अॅक्ट’ असे नाव द्यावे. त्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामाध्यमातून माझा लढा सुरूच राहणार आहे, असे रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राधिका वेमुला यांनी तेलगू भाषेत संवाद साधला. रोहित अॅक्ट जॉयंट अॅक्शन कमिटीचे संयोजक तन्नाही मुन्ना यांनी त्याचे हिंदीत भाषांतर केले.
रोहितच्या आत्महत्येला नऊ महिने झाले परंतु अजूनही त्याला न्याय मिळाला नाही, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की, जातिभेदाचे चटके मी लहानपणापासून सोसले आहेत. मला एका शिक्षक कुटुंबाने दत्तक घेतले होते. तेव्हा मला काही समजतही नव्हते. परंतु त्यांनी मला मुलगी म्हणून नव्हे तर घरकाम करण्यासाठी दत्तक घेतले होते. त्यांनी दहवीपर्यंत शिकवले. परंतु घरकाम करताना ते मला माझ्या माला जातीच्या नावावर शिवीगाळ करायचे. लग्नानंतरही मला सासरी जातीवरुन त्रासच मिळाला. रोहित हा आंबेडकरी विचारांसाठी लढत होता. तो गेल्यावर मी आणि माझा मुलगा राजा याने मुंबई येथे १४ एप्रिल रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे आपणही आता आंबेडकरी चळवळीसाठी लढत राहू.
आंबेडकर स्टुंडट असोसिएशनच्या बॅनर अंतर्गत रोहित व आम्ही लढत होता. कुलगुरू आप्पाराव हे मुख्य आरोपी आहेत. यासोबत सुशीकुमार, रामचंद्र राव, बंडारु दत्तात्रय, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, असे हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे तन्नाही मुन्ना यांनी सांगितले. आमच्यावर आजही कुलगुरू पाळत ठेवून असतात, अशा परिस्थितीत आम्ही लढत असल्याचेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)