खड्डेमय रस्त्याला विकास म्हणायचे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:08 IST2021-03-28T04:08:56+5:302021-03-28T04:08:56+5:30
हिंगणा : हिंगणा तालुक्यातील बहुतांश मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष ...

खड्डेमय रस्त्याला विकास म्हणायचे का?
हिंगणा : हिंगणा तालुक्यातील बहुतांश मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मात्र प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याची ओरड स्थानिक नागरिकांची आहे. हिंगणा ते केळझर या राज्य महामार्गावर वाहन चालवताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमगाव देवळी ते कान्होलीबारा मयालदेवपर्यंतचा डांबरी रस्ता जागोजागी उखडला आहे. बांधकाम विभागाने डागडुजीच्या नावावर केवळ मुरुम माती टाकून लिपापोती केली. या मातीच्या ढिगाऱ्यावरून एखादे चारचाकी वाहन गेल्यास धुरळा उडतो. याच मार्गावर लखमापूर या गावानजीक नाल्यावरील पुलाचे बांधकाम कधीचेच पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही पुलावर भरण भरण्यात न आल्याने वाहतूक सुरू झाली नाही. हिंगणा वळणमार्गावर कित्येक महिन्यापासून संथगतीने काम सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या या कामाने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. उडणाऱ्या मातीच्या धुरळ्याने जनता त्रस्त झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे हिंगणा ते कान्होलीबारा या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे. ट्रकमधून सांडणाऱ्या खडी व चुरीमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. अशीच अवस्था वळणमार्गावरील वाहतुकीसाठी बनविलेल्या बोगद्याची आहे. या बोगद्याचे काम बंद आहे. वळणमार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बोगद्यामुळे पुढील वाहने दिसत नाही, त्यामुळे अपघात होतात. एवढेच नव्हे तर समृद्धी महामार्गाच्या पलीकडे असलेल्या शेतात जायला, बैलबंडी न्यायला शेतकरी बांधवांना मोठी अडचण येत आहे. शेतातील माल घरी कसा आणायचा वा शेतात खत आणि बी-बियाणे कशी न्यायची, हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे. संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.