आरटीओ चेक पोस्टवर वाहनचालकांची लूट
By Admin | Updated: November 30, 2015 02:34 IST2015-11-30T02:34:11+5:302015-11-30T02:34:11+5:30
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावणाऱ्या वाहनांकडून कर (टॅक्स) जमा करण्यासाठी आणि त्या वाहनांना तात्पुरता परवाना (टीपी) ...

आरटीओ चेक पोस्टवर वाहनचालकांची लूट
बिनबोभाट लाखोंची वसुली : वाहनचालकांमध्ये असंतोष
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावणाऱ्या वाहनांकडून कर (टॅक्स) जमा करण्यासाठी आणि त्या वाहनांना तात्पुरता परवाना (टीपी) देण्यासाठी विदर्भात देवरी, सावनेर, कांद्री (रामटेक), देवाडा (राजूरा) आणि पिंपळखुटी, वरुड, खरबीजवळ आरटीओच्या चेक पोस्ट आहेत. या सर्वच ठिकाणांवर वाहनचालकांची अक्षरश: लूट होत असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. प्रत्येक वाहनचालकाकडून एन्ट्री फीच्या नावाखाली ३०० रुपये घेतले जातात. तर, परप्रांतातून आलेल्या वाहनचालकाला एक तात्पुरता परवाना देण्यासाठी १८०० रुपये घेऊन ९०० रुपयांची पावती त्याच्या हातात ठेवली जाते. (ही रक्कम वाहनांनुसार बदलते!) वाहनचालकाने आगावू पैसे देण्यास विरोध केला तर त्याच्या कागदपत्रे तपासणीत त्रुटी दाखवून वाहन अडवून धरले जाते. सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा तसेच पोलिसांच्या हवाली करण्याचा येथे कार्यरत खासगी व्यक्ती धमक्या देतात. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एका चेक पोस्टवरून एका दिवसात किमान १६०० ते १८०० वाहने धावतात. त्यांच्याकडून रोज बिनबोभाट ही वसुली केली जाते. अर्थात् एका चेकपोस्टवर दरदिवशी या अवैध कमाईची अक्षरश: बरसात होते. ही रक्कम मोजण्यासाठी आणि तिचा हिशेब ठेवण्यासाठी वेगळी मंडळी ठेवली जात असल्याची माहिती असून, गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यापूर्वी चंद्रपुरात पोलीस अधीक्षक होते. तेथून बदली होण्यापूर्वी त्यांच्या नजरेत आरटीओ चेक पोस्टवरील गोरखधंदा आला. कारवाईची योजना आखत असतानाच त्यांची बदली झाली. नागपुरात एसीबीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी देवाडा चेक पोस्टवर कारवाईसाठी अभ्यासपूर्ण सापळा लावला. त्यानंतर रुक्मीणीकांत भगवान कळमनकर (चंद्रपूर) या मोटर वाहन निरीक्षकाला अतिशय शिताफीने पकडण्यात आले. त्याने वाहनचालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी आणि ही रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे एजंट ठेवले होते. त्यातीलच राजू टोंगे यालाही एसीबीने अटक केली होती. त्यांच्याकडून मोठी रक्कमही यावेळी जप्त करण्यात आली होती.