नागपूर : कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु या विशेष रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांकडून अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. यात एका प्रवाशाला साधारणपणे २०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कोरोनामुळे रेल्वेत २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन करण्यात आले; परंतु जागोजागी अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमित रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे मे महिन्यापासून विशेष रेल्वे गाड्यांचा पर्याय शोधण्यात आला. परंतु या विशेष रेल्वे गाड्यांसाठी विशेष शुल्क आकारण्यात आले. नाइलाजास्तव प्रवाशांना हे शुल्क मोजावे लागत आहे. नियमित रेल्वे गाड्या सुरू असत्या तर प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली नसती. विशेष रेल्वे गाड्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला १०० ते २०० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. परंतु फायदा होत असल्यामुळे रेल्वे प्रशासन विशेष रेल्वे गाड्या चालवित असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून होत आहे. प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी नियमित रेल्वे गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
.............
कोरोनाच्या आधी धावणाऱ्या रेल्वे गाड्या : १२५
आता धावत असलेल्या रेल्वे गाड्या : ९०
नागपूरवरून विविध ठिकाणचे प्रवासभाडे
मुंबईनियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१५६५, एसी थ्री-११२५, स्लिपर ४३०
विशेष रेल्वे गाड्या : एसी टू-१७१०, एसी थ्री-१२१०, स्लिपर ४६०
पुणे नियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१५१०, एसी थ्री-११६५, स्लिपर ४२५
विशेष रेल्वे गाड्या : एसी टू-१७२५, एसी थ्री-१२०५, स्लिपर ४४५
हैदराबाद नियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१२१०, एसी थ्री ७७०, स्लिपर-३५५
विशेष रेल्वेगाड्या : एसी टु-१३४०, एसी थ्री-९५५, स्लिपर-३६५
दिल्ली नियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१७८०, एसी थ्री १२५५, स्लिपर-५१५
विशेष रेल्वे गाड्या : एसी टू-२०२०, एसी थ्री-१४२०, स्लिपर-५४०
नियमित रेल्वेगाड्या सुरू कराव्यात
‘रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या. परंतु या गाड्यांत अधिक प्रवासभाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांची लूट थांबवावी.’
-प्रशांत सरमोकदम, रेल्वे प्रवासी
आर्थिक लूट थांबवावी
‘विशेष रेल्वे गाड्यांच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. प्रवाशांना १०० ते २०० रुपये अधिक प्रवासभाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने प्रवाशांची आर्थिक लूट थांबवून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-विलास वानखेडे, रेल्वे प्रवासी
...........