कारागृहाजवळ लुटमार

By Admin | Updated: January 4, 2017 02:00 IST2017-01-04T02:00:07+5:302017-01-04T02:00:07+5:30

मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला मारहाण करून एका आरोपीने ३२ हजार ५०० रुपये लुटून नेले.

Robbery near jail | कारागृहाजवळ लुटमार

कारागृहाजवळ लुटमार

भरदिवसा घडली घटना : निवृत्त कर्मचाऱ्याची रक्कम लुटली
नागपूर : मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला मारहाण करून एका आरोपीने ३२ हजार ५०० रुपये लुटून नेले. सोमवारी दुपारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. नानाजी धनाजी इंगळे (वय ५९) असे तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव आहे.
इंगळे गेल्या वर्षी कारागृह सेवेतून निवृत्त झाले. सध्या ते कारागृहाशेजारी असलेल्या कर्मचारी निवासातच राहतात. त्यांना घराचे बांधकाम करायचे असल्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास बँक आॅफ महाराष्ट्रमधून २४ हजार रुपये काढले. त्यांच्या जवळ ८५०० रुपये होते. अशा प्रकारे एकूण ३२,५०० रुपये खिशात घालून ते सायकलने आपल्या निवासस्थानाकडे निघाले. कारागृहाच्या मुख्य दारातून विश्रामगृहाजवळच्या मैदानापासून घराकडे जात असताना अचानक एका आरोपीने त्यांना रोखले. मारहाण करून आरोपीने इंगळे यांच्या खिशातील ३२ हजार ५०० रुपयांची रक्कम हिसकावून घेतली.
झटापटीत इंगळे यांचा खिसाही फाटला. आरोपीने रस्त्यावर आपली मोटरसायकल ठेवली होती. रक्कम हातात येताच ती सुरू करून आरोपी पळून गेला.
इंगळे यांनी आरडाओरड करीत कारागृहासमोरच्या रक्षकांना ही माहिती दिली. मात्र, ते रस्त्यावर येईपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. नेहमी मोठा बंदोबस्त असणाऱ्या कारागृहाजवळ भरदिवसा ही लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली. इंगळे यांनी धंतोली ठाण्यात माहिती कळविताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बँकेतूनच इंगळे यांच्यावर नजर ठेवून होता, हे स्पष्ट झाले. त्याने तेथून पाठलाग करून इंगळेंना निर्जन ठिकाणी गाठले आणि त्यांची रक्कम हिसकावून घेतली. इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोटरसायकलवर मागे बिना नंबरची प्लेट होती. त्यामुळे हा गुन्हेगार सराईत असावा, असा अंदाज काढण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Robbery near jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.