कुंटणखान्यावर अनेकांची लूट
By Admin | Updated: July 12, 2015 03:00 IST2015-07-12T03:00:48+5:302015-07-12T03:00:48+5:30
या टोळीचे कुंटणखाने शहरातील विविध भागात आहेत. त्यासाठी त्यांनी एमआयडीसी, हिंगणा, गोधनी, बेसा, इसासनी, बेलतरोडी आदी भागात ...

कुंटणखान्यावर अनेकांची लूट
कुंटणखान्यावर आढळली तोतया पोलिसांची टोळी
नागपूर : या टोळीचे कुंटणखाने शहरातील विविध भागात आहेत. त्यासाठी त्यांनी एमआयडीसी, हिंगणा, गोधनी, बेसा, इसासनी, बेलतरोडी आदी भागात पॉश फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवले आहेत. या टोळीकडे अनेक श्रीमंत ग्राहकांची यादी असून, शहर तसेच शहराबाहेरच्या अनेक वारांगनांची नावे, फोटो आणि संपर्क क्रमांक आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी अशा प्रकारे ६० ते ७० आंबटशौकिनांना लाखोंचा गंडा घातला असल्याचे पोलीस सांगतात. बदनामीच्या धाकामुळे पीडित व्यक्ती पोलीसच काय मित्रांकडेहीआपबिती सांगण्याची हिंमत दाखवत नव्हता. या टोळीकडून बरीच धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलीस अधिकारी वर्तवित आहेत.
टोळीतील सदस्य
चंद्रप्रकाश विनायक वारवतकर (वय ४७, रा. मानेवाडा, हुडकेश्वर), अमोल मनोरंजन पाटील (वय २५, रा. आदिवासीनगर,संत सावता हायस्कूल जवळ), सारिका महेश पांडे (वय ३०, रा. जयताळा, आखरी बस स्टॉप, शिवप्रिया टॉवर, एमआयडीसी) आणि ज्योती शशांक कापसे तसेच अन्य पाच सदस्य. त्यापैकी वारवतकर हा माजी सैनिक. बहुतांश जणांकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि मुद्रांकही (स्टॅम्प) होते. वारवतकर हा इन्स्पेक्टरच्या थाटात वावरायचा. ही पक्की माहिती कळताच पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अरिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव पोवार यांनी शनिवारी दुपारी सापळा रचून जयताळ्यातील सारिका पांडेच्या कुंटणखान्यावर धाड घातली.
अशी आहे पद्धत
सारिका ग्राहकाला बोलवायची. महिलेसोबत तो खोलीत जाताच ती महिला किंवा मुलगी खोकलायची. हा इशारा मिळताच बाजूला दबा धरून बसलेले कुंटणखान्यावर धाड घालायचे. सापळ्यात अडकलेल्या व्यक्ती/ तरुणाचे नाव, पत्ता, संपर्कक्रमांक लिहून घेतल्यानंतर लगेच पत्रकारांना बोलावण्याची मखलाशी हे तोतया पोलीस करीत होते. बदनामीच्या धाकाने पीडित व्यक्ती गयावया करायचा. वेश्याव्यवसाय करणारी महिला / तरुणीच ‘मांडवली‘ करायची. अशा प्रकारे एका ग्राहकाकडून ३ ते ४ लाख रुपये हडपले जात होते.