नागपुरात कोरोना रुग्णांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:22+5:302021-03-29T04:05:22+5:30

नागपूर : कोरोनाच्या आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील ...

Robbery of Corona patients in Nagpur | नागपुरात कोरोना रुग्णांची लुबाडणूक

नागपुरात कोरोना रुग्णांची लुबाडणूक

नागपूर : कोरोनाच्या आजाराची भीती व त्यावरील उपचार हे मोठे संकट असल्यासारखे प्रत्येकाला वाटत आहे. काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत आज शहरातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सिटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. २५०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू नये असे निर्देशही दिले आहेत. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. मृत्यूचा दरही वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना विषाणू फुप्फुसांना पोखरत असल्याने डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना छातीचा ‘एचआर सिटी स्कॅन’ करण्याचा सल्ला देतात. मागील वर्षी याचा फायदा काही खासगी केंद्र घेत असल्याच्या तक्रारी झाल्या. राज्यात सिटी स्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली. या समितीने खासगी केंद्रांना कोरोना रुग्णांच्या एच.आर. सिटी स्कॅनसाठी जास्तीतजास्त २५०० रुपये दर आकारण्याचे निर्देश दिले. परंतु मोजकेच काही केंद्र सोडता बहुसंख्य केंद्र याच्या दुपटीने रक्कम रुग्णांकडून वसूल करीत असल्याचे दिसून येत आहेत. याबाबतची माहिती मनपाच्या काही अधिकाऱ्यांना आहे. परंतु कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कुणी बिल देते, कुणी देतच नाहीत

इंदोरा चौक येथील एका सिटी स्कॅन अ‍ॅण्ड डायग्नोस्टिक सेंटरने कोरोना रुग्णाच्या सिटी स्कॅनसाठी ३५०० रुपये दर आकारले. शहरातील इतर सेंटरमध्ये सिटी स्कॅनसाठी २५०० रुपयांचे बिल दिले जाते, परंतु पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझेशनचे हजार रुपयांचे अतिरिक्त बिल जोडले जात असल्याचे दिसून आले.

२ ते ३ हजारापर्यंत दर आकारले जाऊ शकतात

सिटी स्कॅन यंत्राच्या स्लाईसनुसार कोरोनाबाधितांच्या चाचणीचे दर शासनाने निश्चित केले आहेत. १६ स्लाईसच्या आत असलेल्या सिटी स्कॅनचे दर २००० आहेत. १६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅनचे दर २५०० तर ६४ स्लाईसहून जास्त असलेल्या सिटी स्कॅनचे दर ३००० ठरवून दिले आहेत. हे दर न परडवणारे आहेत. परंतु शासनाने निश्चित केल्यामुळे यापेक्षा जास्त दर आकारले जात नाहीत. विशेष म्हणजे, नागपुरात ६४ स्लाईसपेक्षा जास्त असलेल्या दोन किंवा तीनच सिटी स्कॅन यंत्र आहेत.

-डॉ. राजू खंडेलवाल, वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट

निश्चित केलेले दरच आकारले जात आहेत

राज्य सरकारने कोरोनाबाधितांचा ‘एच.आर. सिटी स्कॅन’साठी निश्चित केलेला २५०० रुपये दरच आकारला जात आहे. हा दर तसा कमी आहे. यासाठी संघटनेकडून न्यायालयात दाद मागितली आहे. त्याचा निकाल यायचा आहे. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच दर आकारावे, असे आवाहन आहे.

-डॉ. संदीप महाजन

अध्यक्ष, विदर्भ रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशन

Web Title: Robbery of Corona patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.