फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटले

By Admin | Updated: October 24, 2016 15:04 IST2016-10-24T15:04:55+5:302016-10-24T15:04:55+5:30

निर्जन ठिकाणी फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात लुटारूंनी केलेल्या चाकू हल्ल्यात १ विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

Robbed students who went to Photoshoot | फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटले

फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटले

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ -  निर्जन ठिकाणी फोटोशूटसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात लुटारूंनी केलेल्या चाकू हल्ल्यात १ विद्यार्थी गंभीर  जखमी झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. 
प्रज्वल हेमराज बांते (वय १८) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, तो बीई प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. व्यंकटेशनगरात राहणारा प्रज्वल आणि त्याच्या मित्रांनी एक दिवसापूर्वी स्वत:चे फोटो काढण्याची योजना बनविली. त्यासाठी ते रविवारी दुपारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिडगावकडे निघाले. रस्त्याच्या कडेला मनासारखा ‘स्पॉट‘ दिसल्याने त्यांनी स्वत:चे फोटो काढणे सुरू केले. तेवढ्यात तरोडी गावाकडून बजाज अ‍ॅव्हेंजर (एमएच ४९/ टीसी ०४९) दुचाकीवर दोन आरोपी आले. त्यांनी प्रज्वल आणि त्याच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळचा २५ हजार किंमतीचा कॅमेरा हिसकावून घेतला. मोबाईल आणि खिशातील रक्कमही काढू लागले. त्यामुळे प्रज्वलने लुटारूंना विरोध केला. तो प्रतिकार करीत असल्यामुळे एका आरोपीने त्याच्या डोक्यावर दगड मारला. तर, दुस-याने त्याच्या पोटावर चाकूचा घाव मारला. यानंतर शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. जखमी प्रज्वलला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सयाम यांनी प्रज्वलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक मिळाल्यामुळे पोलिसांनी आरटीओच्या माध्यमातून आरोपींचे नाव पत्ता मिळवला. 

सेल्फी कल्चर धोकादायक 
सध्या तरुणाईत सेल्फी कल्चरची धूम आहे. सेल्फी काढून घेण्यासाठी युवक-युवती आटापिटा करताना दिसतात. सेल्फीसोबतच स्वत:चे फोटो काढून घेण्यासाठी युवक युवती धोक्याच्या ठिकाणी जाऊन जोखीम पत्करतानाही दिसतात. त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतल्याचे आणि अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे माहित होऊनही युवक-युवती त्यापासून धडा घ्यायला तयार नाही.  प्रज्वल आणि त्याच्या मित्रांनी रविवारी जंगलासारख्या निर्जन ठिकाणी जाऊन  फोटोशूटच्या प्रयत्न केला. १७ - १८ वर्षांची मुले बघून लुटारूंनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आणि ही घटना घडली.

Web Title: Robbed students who went to Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.