बरसला पण उकाडा वाढला
By Admin | Updated: June 17, 2014 00:53 IST2014-06-17T00:53:26+5:302014-06-17T00:53:26+5:30
उन्हामुळे त्रासलेल्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला असला तरी त्यामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

बरसला पण उकाडा वाढला
उपराजधानीत पावसाची हजेरी : शेतकऱ्यांना मात्र प्रतीक्षा
नागपूर : उन्हामुळे त्रासलेल्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला असला तरी त्यामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील आठवड्यात सलग ४७ अंश से. तापमानामुळे संपूर्ण शहर होरपळून निघाले असताना व सगळ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले असताना या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येऊ लागल्या आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण केला असता तरी आर्द्रता वाढल्याने मात्र नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर कडाक्याचे उन्ह असताना दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली. पावसाच्या जोरदार सरीही आल्या.
पाऊस आणखी काही काळ सुरू राहील असे वाटत असतानाच त्याने निरोपही घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी जाण्याच्याच वेळी पाऊस आल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींना इच्छा नसतानाही कार्यालयात थांबावे लागले तर काहींनी ओले होत घरी जाण्याचा आनंद लुटला. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. सोमवारी ४१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मंगळवारीही चित्र असेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान निम्मा जून संपला तरी ग्रामीण भागात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते.
मागील वर्षी वेळेत मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी या काळापर्यंत पेरण्याही सुरू केल्या होत्या. यंदा पावसाचीच वाट बघणे सुरू आहे.(प्रतिनिधी)