Roads greater than 12 meters in Nagpur should be encroached free | नागपुरातील १२ मीटर पेक्षा मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त करा
नागपुरातील १२ मीटर पेक्षा मोठे रस्ते अतिक्रमणमुक्त करा

ठळक मुद्देअतिक्रमण निर्मूलन समितीची शिफारस : अतिक्रमणामुळे अपघात वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण शहरात फुटपाथ आणि रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. अतिक्रमणामुळे अपघाताचेही प्रमाण वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याने १२ मीटरहून अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील संपूर्ण अतिक्रमण काढा , ही कारवाई महापालिका व पोलीस विभागाने संयुक्तरित्या करावी. अशी शिफारस अतिक्रमण निमूलन समितीने केली आहे.
शहरातील अतिक्रमणाच्या समस्येसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेउन अहवाल तयार करण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली आहे. सोमवारी महापालिका कार्यालयातील आयुक्त सभागृहात झालेल्या समितीच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. यावेळी आयुक्त अभिजीत बांगर, वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडीत, समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, आभा पांडे, वाहतूक एसीपी जयेश भांडारकर, सहायक आयुक्त सर्वश्री अशोक पाटील, महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, विशेष आमंत्रित सदस्य ज्येष्ठ प्रवीण दटके, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती अ‍ॅड.संजय बालपांडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात धोरण निश्चित करण्याविषयी चर्चा करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनासाठी झोननिहाय पथक गठित करणे, झोननिहाय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाईत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्के बांधकाम करून दुकान चालविणाऱ्या दुकानदारांकडून दुकानासमोर केल्या जाणाऱ्या अतिक्रमणासंदर्भातही कठोर भूमिका घ्यावी लागेल. अतिक्रमण करणाऱ्यांच्या दंडामध्ये वाढ करून जप्त सामान परत न करण्यावर चर्चा झाली.

परवानाधारकांवरही कारवाई करा
महापालिकेकडून परवाना घेऊ न व्यवसाय करणा-यांकडून होणाऱ्या अतिक्रमणाबाबतही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. अशा अतिक्रमणधारकांकडून अधिक वाढीव दंड वसूल करण्याची तरतूद करणे, वारंवार अतिक्रमण होत असल्यास परवाना रद्द करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी रविवारी संघटितरित्या नवीन बाजार निर्माण होत आहेत. रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतूक जाम करणाऱ्या अशा बाजारांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक गठीत करणे शिवाय दिवसभर किंवा सायंकाळी व्यवसाय केल्यानंतर फुटपाथवर ठेवले जाणारे ठेले, हातगाड्याबाबत रात्रकालीन पथकाकडून कारवाई व्हावी,अशी श्शिफारस समितीने केली.

बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्यास तिप्पट दंड
बांधकाम साहित्याची विक्री करणा-या व्यावसायीकांकडून रस्त्यावर साहित्य ठेवले जाते. रस्त्यावर बांधकाम साहित्य आढळल्यास अशा व्यावसायीकांकडून सामान्य दंडाच्या रक्कमेच्या तिप्पट जास्त रक्कम दंड म्हणून वसूल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. फुटपाथ, रस्त्यावर ठेवण्यात येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिस विभागाकडून कारवाई करण्यात यावी, या कारवाईला महापालिकेतर्फे सहकार्य करून जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी मनपातर्फे मैदान उपलब्ध करून देण्याबाबत सर्वांनी एकमत दर्शविले. अतिक्रमण कारवाईमध्ये मनपा पथकासह पोलिस विभागाकडूनही समांतर दंड वसूल करण्यात यावे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना एकाच कारवाईत दुप्पट दंड भरावा लागल्यास अतिक्रमणाबाबत भिती निर्माण होईल, अशी सूचना केली.योग्य निर्णयासाठी या धोरणाचा अहवाल महापौरांकडे सादर करण्यात येणार आहे.

मनपा व पोलीस विभाग संयुक्त अतिक्रमण निर्मूलन कारवाई करणार
शहरातील वाढत्या अतिक्रमण समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन चर्चा केली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त अभिजित बांगर, वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित उपस्थित होते.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विळख्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मनपातर्फे कठोर पाऊ ल उचलण्यात येत आहे. अतिक्रमण संदर्भात येत्या ७ डिसेंबरला मनपाची विशेष सभा घेतली जाणार आहे. शहरातील रस्ते, फूटपाथ मोकळे व्हावेत, शहर अतिक्रमणमुक्त व्हावे, यासाठी मनपा व पोलीस विभाग संयुक्त व समन्वयाने कार्य करेल, असा विश्वास यावेळी जोशी यांनी व्यक्त केला.
शहरातील वाढते अतिक्रमण ही मोठी समस्या आहे. काही बाबतीत मनपा तर काही बाबतीत पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र संपूर्ण शहरातून अतिक्रमण हद्दपार करण्यासाठी दोन्ही विभागाने एकत्रित येऊ न कारवाई करणे गरजेचे आहे, यासाठी पोलीस विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले.
मनपा व पोलीस विभागाकडून संयुक्तरीत्या करण्यात येणारी कारवाई, दोन्ही विभागातील समन्वय आणि यासाठी आवश्यक बंदोबस्त या सर्वांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

Web Title: Roads greater than 12 meters in Nagpur should be encroached free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.