रस्ता धसला !

By Admin | Updated: July 22, 2015 03:08 IST2015-07-22T03:08:19+5:302015-07-22T03:08:19+5:30

बेसा पॉवर हाऊसजवळील घटना : मोठी दुर्घटना टळली

The road knocked down! | रस्ता धसला !

रस्ता धसला !

नागपूर : एखाद्या शहरात भूकंप आल्यानंतर रस्ता जमिनीत धसल्याचे जसे चित्र पहायला मिळते तसेच भयावह चित्र मंगळवारी दिघोरी चौक ते बेसा पॉवर हाऊसच्या रस्त्यावर पहायला मिळाले. या मार्गावरील सुमारे १०० फूट लांब रस्ता जमिनीत धसला. यामुळे या भागात खळबळ माजली. जमिनीत धसलेला रस्ता पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. सुदैवाने एकही वाहन चालकाला या दुर्घटनेचा फटका बसला नाही.
बेसा पॉवर हाऊसच्या जवळील रस्त्याला काही दिवसांपासून भेगा पडल्या होत्या. भेगा वाढत असल्याचे पाहून येथे पोलिसांनी बॅरिकेट लावले होते.
मात्र, त्यानंतरही काही प्रमाणात वाहतूक सुरू होती. मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक मोठा आवाज आला व रस्ता जमिनीत धसत असल्याचे नागरिकांना दिसले. वाहनचालकांनी पूर्वी वाहने थांबविली व एकच कल्लोळ सुरू केला. या कल्लोळामुळे या रस्त्यावरून दोन्ही बाजूने येणारी वाहने तत्काळ थांबली.
पाहता पाहता रस्ता सुमारे एक फूट जमिनीत धसला. घटनेची माहिती मिळताच सक्कारदरा व हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. महापालिकेच्या नेहरूनगर झोनचे अभियंते घटनास्थळी पोहचले. त्यांनी धसलेल्या रस्त्याची पाहणी केली.
या दुर्घटनेत एक व्यक्ती सापडल्याची अफवा पसरली. मात्र, पोलिसांनी यात कुणीही जखमी झाले नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
रस्त्याच्या शेजारी होता कचरा डम्प
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या ४० फूट रुंदीच्या रस्त्याला काही दिवसांपासून भेगा पडू लागल्या होत्या. मात्र, मंगळवारी अचानक सुमारे १०० फूट लांब रस्ता जमिनीत धसला. या रस्त्याच्या शेजारी कचरा डम्प केला जातो. त्यामुळे या रस्त्यावरून हेवीवेट टिप्पर व जेसीबीची वाहतूक सुरू असते. याशिवाय संबंधित रस्त्याच्या बाजूनेच बेसा पॉवर हाऊस ते नरसाळापर्यंत जाणारा नालाही आहे. नाल्यामुळे भुसभुशीत झालेली माती पावसामुळे खचून वाहून गेली असेल व त्यामुळेच रस्ता खाली धसला असावा, असा तर्क बांधला जात आहे.

Web Title: The road knocked down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.