प्रशासनाविरोधात शिक्षकांमध्ये खदखद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:07 IST2021-04-21T04:07:44+5:302021-04-21T04:07:44+5:30
नागपूर : जिल्ह्यात सर्वेक्षण, लसीकरण, कोरोना तपासणी केंद्र, कोविड नियंत्रण कक्ष, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग या कामांसाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या ...

प्रशासनाविरोधात शिक्षकांमध्ये खदखद
नागपूर : जिल्ह्यात सर्वेक्षण, लसीकरण, कोरोना तपासणी केंद्र, कोविड नियंत्रण कक्ष, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग या कामांसाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहे. जे शिक्षक यासाठी काम करीत आहे. त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येत नसल्याने अनेक शिक्षक बाधित होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी शिक्षकांचा कर्तव्य बजावत मृत्यूही झाला आहे. परंतु त्यांना शासनाकडून मदत मिळाली नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून शाळा बंद आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यासोबतच कोरोना निवारणार्थ सेवेत आहे. गेल्यावर्षी स्वस्त धान्य दुकानात नागरिकांना रांगेत लावण्यापासून नाक्यावर, बाजारात शिस्तीचे धडे दिले. मात्र त्या दरम्यानही शिक्षकांना सुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळे अनेक शिक्षक बाधित होऊन मृत्यू झाले. आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून, ६ ते ७ हजारांच्या आसपास रुग्ण दररोज आढळून येते. शासकीय रुग्णालयात खाटा शिल्लक नाही. तर खासगीमध्ये गोरखधंदा सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे शिक्षकांना जबाबदारी दिली आहे.
शिक्षकांची सेवा घेताना त्यांना रीतसर आदेश देण्यात आले नाही. बाधित झाल्यास उपचाराची व्यवस्था नाही. फ्रंटलाइन वर्करसाठी असलेले विमा कवच नाही. विशेष म्हणजे जोखमीच्या ठिकाणी काम करतांना पीपीई कीट व इतर आवश्यक सुरक्षात्मक साधने नाही. हे प्रशासनाचे कर्तव्य असताना कुठलीही सुविधा पुरविली जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
- बाधित झालेल्या शिक्षकांची उपचाराची सोय करण्यात यावी. सेवा अधिग्रहित केल्याचे रितसर आदेश देण्यात यावे. कोविड विमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा आणि जोखमीच्या ठिकाणी काम करताना पीपीई कीट व इतर सुरक्षात्मक साधने उपलब्ध करून देण्यात यावी.
धनराज बोडे, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ