रिपोर्ट वेळीच मिळत नसल्याने संक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:12+5:302021-04-05T04:07:12+5:30
नागरिकांच्या तक्रारी : मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरानोच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात ...

रिपोर्ट वेळीच मिळत नसल्याने संक्रमणाचा धोका
नागरिकांच्या तक्रारी : मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरानोच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. यात प्रामुख्याने शहरातील उच्चभ्रू वस्त्याचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात ७८ बाधितांचे मृत्यू होते, तर मार्च महिन्यात तब्बल ४७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांहून अधिक आहे. दररोज साडेतीन ते चार हजारांच्या आसपास पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची वेळीच चाचणी होणे गरजेचे आहे. परंतु, चाचणीचा रिपोर्ट वेळीच मिळत नसल्याने तोवर बाधित अनेकांच्या संपर्कात येत असल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे.
लक्ष्मीनगर, हनुमाननगर, मंगळवारी व धरमपेठ झोन अंतर्गत अनेक वस्त्यांना प्रतिबंधित क्षेत्र करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी होणे गरजेचे आहे. चाचणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणे अपेक्षित आहे. काहींना दुसऱ्या दिवशी दुपारी तर काहींना तिसऱ्या दिवशी मिळतो. यादरम्यान संबंधित व्यक्तीला लक्षणे नसल्याने तो सर्वत्र भटकंती करीत असतो. अशा व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे.
शहरात करोनारुग्णांचा शोध घेण्यासाठी आरआरटी पथक व महापालिकेच्या दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. संबंधित झोनमध्ये तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात महापालिकेची पाच कोरोना रुग्णालये आहेत. मात्र, सर्वच रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत. आमदार निवास, व्हीएनआयटी आणि पाचपावली पोलीस निवास केंद्र ही तीन विलगीकरण केंद्रे आहेत. मात्र, या तीनही ठिकाणी एकूण २१५ रुग्ण सध्या विलगीकरणात, तर २८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
...
प्रशासनाने दखल घ्यावी
कोरोना चाचणी केल्यानंतर संबंधितांना दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकांना तिसऱ्या दिवशी मिळतो. यासंदर्भात मनपा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.