लुटमार, छेडछाड करणाऱ्यांंविरुद्ध जनआक्रोश
By Admin | Updated: September 27, 2016 03:24 IST2016-09-27T03:24:05+5:302016-09-27T03:24:05+5:30
महिला घरात एकटी असल्याचे पाहून लुटमार करून पळून जाणाऱ्या एका आरोपीची गायत्रीनगर, हजारीपहाड

लुटमार, छेडछाड करणाऱ्यांंविरुद्ध जनआक्रोश
नागपूर : महिला घरात एकटी असल्याचे पाहून लुटमार करून पळून जाणाऱ्या एका आरोपीची गायत्रीनगर, हजारीपहाड परिसरातील नागरिकांनी बेदम धुलाई केली. त्याचे हातपाय बांधून नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. मुकेश शिवानंद पासवान (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो याच भागातील आशा बालवाडीजवळ राहतो. संतप्त नागरिकांकडून आरोपीची धुलाई होण्याची दुसरी एक घटना रविवारी रात्री जरीपटक्यात घडली. या दोन्ही घटनांमुळे छेडछाड, लुटमार करणारांविरुद्धचा नागरिकांच्या मनातील आक्रोश अधोरेखित झाला आहे.
पती बाहेर गेल्यामुळे रविवारी दुपारी २.३० वाजता वैशाली दत्ता खोडे (वय ३३, रा. गायत्रीनगर) आपल्या मुलासह घरात बसून होत्या. तेवढ्यात आरोपी मुकेश दारावर आला. त्याने वैशाली यांना पिण्याचे पाणी मागितले. तो ओळखीचा असल्याने वैशालीने मुलाला खाली ठेवून आरोपीला पिण्याचे पाणी दिले. घरात कुणीच नसल्याची खात्री पटल्याने आरोपीने एका हाताने वैशालीचे तोंड दाबले आणि दुसऱ्या हाताने तिचे ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. आरोपीने कंपाउंड वॉलवरून उडी मारून पळ काढला. तत्पूर्वीच वैशालीने आरडाओरड केल्याने बाजूच्या लोकांनी त्याला पकडले. हातपाय बांधून त्याची बेदम धुलाई केली आणि गिट्टीखदान पोलिसांना कळविले. ठाणेदार राजेंद्र निकम यांनी लगेच पोलिसांचा ताफा पाठविला.
उपनिरीक्षक डी. ए. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांंनी आरोपी मुकेशला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी खासगी वाहनचालक म्हणून आधी वैशालीच्या पतीसह काम करीत होता. (प्रतिनिधी)
जरीपटक्यात
मजनूची धुलाई
दुसरी घटना रविवारी रात्री जरीपटक्यात घडली. येथील एक तरुणी (वय २५) एका खासगी संस्थेत काम करते. सुटी असल्यामुळे रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास आपल्या बहिणीसह साई मंदिरातून दर्शन करून परतली. आईवडील, भावाशी गप्पा केल्यानंतर ती पहिल्या माळ््यावरील आपल्या शयनकक्षात गेली. तेथे युवराज पवार (वय २१, रा. हसनबाग) हा आरोपी आधीच दडून बसला होता. त्याने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. या अनपेक्षित प्रकारामुळे भांबावलेल्या तरुणीने आरडाओरड केली. त्यामुळे घरची मंडळी आणि शेजाऱ्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवराजला पकडले. घटना कळताच संतप्त नागरिकांनी युवराजची बेदम धुलाई केली. माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी युवराजला संतप्त नागरिकांच्या तावडीतून सोडवले. त्याच्यावर मेयोत प्रथमोपचार करून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.