हुल्लडबाज धनिकपुत्रांची कारने जीवघेणी ‘स्टंटबाजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:43+5:302021-02-05T04:44:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना काही धनिकपुत्रांनी कायद्याला वाकुल्या दाखवत ...

Riot rich sons' car killed in 'stunt' | हुल्लडबाज धनिकपुत्रांची कारने जीवघेणी ‘स्टंटबाजी’

हुल्लडबाज धनिकपुत्रांची कारने जीवघेणी ‘स्टंटबाजी’

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना काही धनिकपुत्रांनी कायद्याला वाकुल्या दाखवत जीवघेणी ‘स्टंटबाजी’ करण्याचा प्रकार केला. वंजारीनगर उड्डाणपुलावर अतिवेगाने कार चालवत ‘हॉलीवूड स्टाईल’ची ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री शहरात असताना हा प्रकार घडत होता व पोलिसांना याची माहितीदेखील नव्हती. ‘सोशल मीडिया’वर ‘व्हिडीओ’ समोर आल्यानंतर पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचली.

पोलिसांनीदेखील कठोर कारवाई न करता केवळ समज देण्याची व चालानची थातूरमातूर कारवाई केली आहे.

वंजारीनगर येथील उड्डाणपुलावर काही तरुणांनी अतिवेगाने कार चालविल्या व ‘स्टंट’ केले. यात समनसिंह, संत ज्ञानेश्वरी कॉलोनी (२०) मानकापूर, वाहन क्रमांक एम.एच.३१/एफ.ए./८८६९, अमिन अंसारी शब्बीर अहमद (२०) सैफी नगर, मोमिनपुरा होंडा सिटी क्रमांक एम.एच./३१/ई.यू./४२९२, अनिकेल महेंद्र माहुले (१९) शेव्रोले क्रूज क्रमांक एम.एच./१५/सी.एम./३६३६ आणि सोहेल खान (२५) मकबुल मस्जिदजवळ, जुना मानकापूर क्रेटा क्रमांक एम.एच.३१/एफ.आर./१८४७ यांचा यात समावेश होता. उड्डाणपुलाच्या एका बाजूने वेगाने कार आणत अचानक ब्रेक दाबून ‘स्किड’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौघांनीही आळीपाळीने ‘स्टंटबाजी’ केली. त्यांचाच एक सहकारी याचा व्हिडीओ घेत होता. तर त्यांचे इतर सहकारी कारमध्ये बसून हुल्लडबाजी करत होते.

हा व्हिडीयो ‘सोशल मीडिया’वर आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले. संबंधित तरुणांना शोधून त्यांच्या कार जप्त करण्यात आल्या. तर त्यांना कुटुंबीयांसमवेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. यानंतर अशा प्रकारचे कृत्य केले तर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.

केवळ ‘चालान’ आणि कार महिनाभरासाठी जप्त

पोलिसांनी तरुणांविरोधात बेजबाबदारीने वाहन चालविणे, कार व क्रमांकात बदल करणे, काळी ‘फिल्म’ लावण्याबाबत ‘चालान’ कारवाई केली. तर कार महिन्याभरासाठी जप्त करण्यात आल्या. ‘स्टंट’ पाहून नागरिक दहशतीत असून या तरुणांविरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी समोर येत आहे. या ‘स्टंटबाजी’मुळे कुणाचा जीवदेखील जाऊ शकत होता.

‘टीम-४७’शी जुळले आहेत तरुण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोप ‘टीम-४७’शी जुळलेले असून त्यांचे ‘इन्स्टाग्राम’वर ‘पेज’देखील आहे. ‘स्टंटबाजी’ करणे व हुल्लडबाजीसाठी ते चर्चेत असतात. त्यांच्या कारवरदेखील ‘टीम-४७’चा ‘लोगो’ बनला आहे.

वाहतूक परवानाच जप्त व्हावा

नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या तरुणांचा वाहतूक परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी याअगोदर असे कृत्य करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याची ‘आरटीओ’कडे शिफारस केली आहे.

Web Title: Riot rich sons' car killed in 'stunt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.