आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चा
By Admin | Updated: December 24, 2014 00:43 IST2014-12-24T00:43:53+5:302014-12-24T00:43:53+5:30
एकीकडे राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर आणि इतर गैरआदिवासी जातींचा समावेश करावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून क्षेत्रबंधन

आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चा
आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ : औरंगाबादसह विदर्भातून एकत्र आले विद्यार्थी
नागपूर : एकीकडे राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर आणि इतर गैरआदिवासी जातींचा समावेश करावा म्हणून सरकारवर दबाव आणला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून क्षेत्रबंधन आणि बोगस आदिवासींच्या अतिक्रमणामुळे खऱ्या आदिवासींचे आजवर प्रचंड नुकसान झाले आहे. नव्या सरकारला याची जाणीव व्हावी आणि खऱ्या आदिवासींचे प्रश्न गांभीर्यांने सोडवावेत, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी विधानभवनावर ‘हक्क निर्धार’ मोर्चा काढला.
आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात पहिल्यांदाच शेकडोच्या संख्येत विद्यार्थी एकत्र आले होते. मोर्चाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा व अंबरिश राजे आत्राम हे भेट देतील, अशा अनेकांच्या अपेक्षा होत्या. परंतु मंत्री मोर्चात येणारच नसल्याचा निरोप आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. यातील काही विद्यार्थी ठिय्या आंदोलन करण्याच्या विचारात होते. तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र मंत्र्यांनी सायंकाळी भेटण्यास बोलविल्याने तणाव निवळला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री राजे अंबरिश राजे आत्राम यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी आत्राम यांनी मागण्यांवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मोर्चाला आ. संजय कुराम, आ. राजू तोडसाम यांनीही भेटी दिल्या.
नेतृत्व
डॉ. नरेश उईके, मुकेश नरोटे, गजानन कुमरे, जयमाला पारवेकर, रंजित सयाम.
मागण्या
धनगर आणि इतर कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये.
बोगस आदिवासींना संरक्षण देणारा अध्यादेश त्वरित रद्द करावा.
अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर कार्यरत असलेल्या केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांची जात पडताळणी करून कारवाई करावी.
वसतिगृह व आश्रम प्रशस्त इमारतींचे बांधकाम योजनाबद्ध व त्वरेने सुरू करावे.
प्रकाश झुंगरे परिवाराच्या हत्याप्रकरणी सीबीआय चौकशी करावी.