गोळीबार अंगलट : तक्रारकर्ता निघाला शस्त्राचा तस्करनागपूर : प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला फसवण्यासाठी स्वत:च्या मांडीवर गोळी झाडून घेणारा मुश्ताक अशरफी नामक तरुण शस्त्राचा (देशी कट्टे) तस्कर असल्याचे उघड झाले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे आणि गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एवढेच नव्हे तर मुश्ताक आणि त्याच्या साथीदारांकडून सात देशी कट्टे जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. २१ जुलैच्या मध्यरात्री आपले अपहरण करून कुख्यात गुंड आबू ऊर्फ फिरोज खान, शहनवाज खान, राजू शेख ऊर्फ टकल्या तसेच त्यांच्या दोन साथीदारांनी आपल्या मांडीत गोळी झाडली, अशी तक्रार मुश्ताक अन्सारीने यशोधरानगर पोलिसांकडे केली होती. हादरलेल्या पोलिसांनी लगेच धावपळ करून कुख्यात आबू, शहनवाज आणि टकल्याला अटक केली. त्यांच्यावर अपहरण, प्राणघातक हल्ला आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. आबू आणि त्याचे साथीदार यावेळी आपण हा गुन्हा केलाच नाही, असे ओरडून ओरडून सांगत होते. मात्र, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्यावर विश्वास न करता कडक कारवाई केली. दरम्यान, जखमी मुश्ताक चांगला झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. मुश्ताक प्रॉपर्टी डीलिंगच्या आड सल्लू ऊर्फ फिरोज अली (यादवनगर) आणि मुमताज मो. मुमताज रसूल (मोमिनपुरा) यांच्या मदतीने देशी कट्टे खरेदी विक्री करतो अशी माहिती उघड झाली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपी शहबाज वसी इसान अली (वय २७, रा. टेका नाका हबीबनगर), इसरार अहमद मुमताज अहमद (रा. मोमिनपुरा), अभिषेक उर्फ विक्की शर्मा (लालगंज, बारईपुरा), अब्दुल वहीद उर्फ खोका वाजीद कुरेशी (वय ३१, फ्रेंड्स कॉलोनी), अमरेंद्रसिंह हरमेंद्रसिंह बग्गा (वय २२, रा. प्रतापनगर), मोसीन अहमद असरार अहमद (सैफीनगर, मोमिनपुरा), अब्दुल अलीम अब्दुल अजीज (वय २९, रा. यशोधरानगर) आणि मोहम्मद मुमताज मोहम्मद रसूल खान (वय २९,रा. मोमिनपुरा) यांच्याविरुद्ध हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून सात माउझर जप्त केल्याची माहितीही अतिरिक्त आयुक्त तरवडे यांनी दिली. हे माउझर आरोपींनी कुठून आणले, त्याची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)भावानेच केली बनवाबनवी उघडआरोपी शहनवाजने एक सरकारी भूखंड दाखवून तो आपला असल्याची बतावणी केली आणि त्याच्या विक्रीचा सौदा करून मुश्ताककडून १८ लाख रुपये उकळले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर मुश्ताकने त्याला रक्कम परत मागितली. मात्र, ती परत करण्याऐवजी शहनवाजने कुख्यात आबूमार्फत मुश्ताकवर दबाव आणण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे मुश्ताक चिडला आणि त्याने शहनवाजसह आबू आणि त्याच्या साथीदारांना धडा शिकविण्यासाठी स्वत:वर गोळी झाडून घेतली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार बनावट आहे, असे मुश्ताकचा सख्खा भाऊ गुलाम अशरफी याने अतिरिक्त आयुक्त तरवडे यांना लगेच मॅसेज पाठवून उघड केला. त्यामुळे नंतरचा घटनाक्रम सहजपणे उघड होत गेला.धाक दाखवून रक्कम उकळलीपकडण्यात आलेल्यांपैकी अमरेंद्रसिंह हरमेंद्रसिंह बग्गा हा एका ढाब्याचा मालक असून, पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनविल्याची चर्चा होती. या प्रकरणात २० ते २५ जणांना चौकशीच्या नावाखाली आणले आणि त्यांना कारवाईचा धाक दाखवत लाखो रुपये उकळल्याची चर्चा असल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिले असता, आम्ही त्याची चौकशी करू, असे उपायुक्त दीपाली मासिरकर म्हणाल्या. पुरावे आढळल्यास दोषीवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणात प्रवीण मघाडे, फैजुल आणि सोनुनामक कुख्यात गुन्हेगार फरार आहेत.
प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला फसवण्यासाठी कुभांड
By admin | Updated: August 2, 2015 02:56 IST