विधी विद्यापीठ कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: December 17, 2015 03:04 IST2015-12-17T03:04:05+5:302015-12-17T03:04:05+5:30
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीत कायदेशीर तांत्रिक बाधा निर्माण झाली होती.

विधी विद्यापीठ कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा
योगेश पांडे नागपूर
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीत कायदेशीर तांत्रिक बाधा निर्माण झाली होती. विधिमंडळात विधी विद्यापीठ अधिनियम, २०१४ चे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही तांत्रिक अडचण अखेर दूर झाली असून कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना नागपुरात होण्याची घोषणा झाल्यानंतर यासंदर्भात २०१४ साली कायदादेखील तयार करण्यात आला होता. परंतु तरीदेखील प्रत्यक्ष विद्यापीठ सुरू होण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. विधी विद्यापीठाचे काम कधीच सुरू व्हायला हवे होते. परंतु यातील कायद्याच्या वाक्यरचनेमुळे कायदेशीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या कायद्यात संबंधित विद्यापीठाचा कुलगुरू त्याच विद्यापीठातील असावा अशी ही वाक्यरचना होती. परंतु हे विद्यापीठच अस्तित्वात नसल्याने या नियमांनुसार पात्र कुलगुरू कुठून येणार असा प्रश्न उभा ठाकला होता. यामुळे या विद्यापीठाची पदभरतीच रखडली होती.ही तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेत या विधेयकात सुधारणा करण्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला. या मसुद्यात विधेयकातील कलम २८ च्या पोट कलम (३) मध्ये कुलगुरूपदाच्या अर्हतेत बदल करण्यात आला. यानुसार कुलगुरू महाविद्यालयात विधी प्राध्यापक असेल किंवा विद्यापीठात विधी प्राध्यापक असेल असे नमूद करण्यात आले. हे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आले व त्यानंतर मंगळवारी विधान परिषदेत सादर करण्यात आले. दोन्ही सभागृहांनी या विधेयकातील सुधारणेला एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे आता तांत्रिक घोळ दूर झाला असून कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.