रिक्षाचालकाचे अपहरण करून हत्या
By Admin | Updated: April 17, 2017 21:40 IST2017-04-17T21:40:19+5:302017-04-17T21:40:19+5:30
तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, तो गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता.

रिक्षाचालकाचे अपहरण करून हत्या
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, तो गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता. सोमवारी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीरावर शस्त्राने भोसकल्याच्या अनेक खुणा आढळल्या. त्यामुळे त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
निकेश आॅटो चालवत होता. ९ एप्रिलपासून तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा ठिकठिकाणी शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे पालकांनी नंदनवन ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. पालक आणि पोलीस निकेशचा शोध घेत असताना वाठोड्यातील एका विहिरीतून दुर्गंध येत असल्याने काही जणांनी तिकडे धाव घेतली.
विहिरीत मृतदेह आढळल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो निकेश साठवणेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांशी पोलिसांनी चर्चा केली, तेव्हा निकेशची शस्त्राचे घाव घालून हत्या झाल्याचा अंदाज काढण्यात आला. त्यामुळे निकेशचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा गुन्हा नंदनवन पोलिसांनी दाखल केला. त्याच्या हत्येच्या संशयावरून पोलिसांनी प्रारंभी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर या हत्येत एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती पुढे आली.