दलित युवकांवरील गुन्हे मागे घ्या :  नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:14 AM2018-04-05T00:14:13+5:302018-04-05T00:14:27+5:30

Revoke Crime on Dalit Youth: Nitin Raut | दलित युवकांवरील गुन्हे मागे घ्या :  नितीन राऊत

दलित युवकांवरील गुन्हे मागे घ्या :  नितीन राऊत

Next
ठळक मुद्देभाजपाचे लोक पोलिसांना नावे देत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कुठल्याही सामाजिक हिंसाचाराचा काँग्रेस पक्ष निषेध करते. मात्र, आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने भारत बंद करणाऱ्या दलित युवकांवर पोलीस व प्रशासनाकडून होत असलेल्या अत्याचाराचाही निषेध कराल तेवढा कमी आहे. खोट्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या दलित युवकांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी. शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित युवकांना मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी केली आहे.
राऊत यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीच्या विरोधात २ एप्रिल २०१८ रोजी भारत बंद आंदोलनात शांततापूर्ण सहभागी होणाऱ्या दलितांविरोधात भाजपाशासित राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली. भाजप नेते आणि कार्यकर्ते पोलिसांना दलित युवकांची यादी देत आहेत. काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलीस रात्री पकडत असून त्यांना मारहाण करीत आहेत. खोट्याप्रकरणी खटला दाखल केला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
महिला, मुली आणि मुलांना त्यांच्या घरातून रात्रीच पोलीस ठाण्यात बोलाविले जात आहे. पोलिसांच्या छळापासून सुटण्यासाठी अनेक युवक आपल्या घरातून पळून गेले आहेत. २ एप्रिलच्या आंदोलनादरम्यान सुमारे १० दलित मारले जातात. या राज्यांमध्ये पोलीस दलितांना ठार मारणाऱ्यांना शोधून काढत नाहीत. त्याऐवजी, भाजपाच्या कार्यालयातून नियंत्रण ठेवणारे पोलीस निर्दोष दलितांवर कारवाई करीत आहेत. अटक केलेल्या युवकांना पोलिसांनी मारहाण केली आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांविरोधात पोलीस आणि प्रशासन बदल्याची कारवाई करीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

Web Title: Revoke Crime on Dalit Youth: Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.