नागनदीच्या मास्टर प्लॅनचा आढावा
By Admin | Updated: November 19, 2015 03:34 IST2015-11-19T03:34:52+5:302015-11-19T03:34:52+5:30
नागनदी व गांधीसागरचे शुद्धिकरण करण्याच्या दृष्टीने महापालिके ने प्रयत्न चालविले आहेत.

नागनदीच्या मास्टर प्लॅनचा आढावा
महापौरांचे आवाहन : नागनदी स्वच्छतेबाबत सूचना द्या
नागपूर : नागनदी व गांधीसागरचे शुद्धिकरण करण्याच्या दृष्टीने महापालिके ने प्रयत्न चालविले आहेत. याबाबतच्या ड्राफ्ट कन्सेप्ट मास्टर प्लॅनवर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापौर प्रवीण दटके यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेतली.
स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, स्थापत्य विद्युत व प्रकल्प विशेष समितीचे सभापती सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त आर.झेड. सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, शशिकांत हस्तक, कार्यकायी अभियंता संजय गायकवाड, राहुल वारके, महेश गुप्ता व श्याम चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी ड्राफ्ट कन्सेप्ट मास्टर प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. हा मास्टर प्लॅन अंंितम करण्याचा पूर्वीचाच टप्पा आहे. यात नागनदी स्वच्छ पााण्याने कशी वाहू शकेल. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात अस्तित्वात असलेले लँड यूज, येणारे सिव्हरेज, नाले आदींचा विचार करून नागनदी स्वच्छ करण्याबाबत एचसीपी डिझाईन कन्सलटंट, अहमदाबाद यांनी तयार केलेल्या ड्राफ्ट मास्टर प्लॅनवर चर्चा करण्यात आली.
एचसीपी डिझाईन कन्सल्टंट हे अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या विकास आराखड्यावर काम करीत आहे. या कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी तयार केलेल्या सुधारित आराखड्यावर चर्चा करण्यात आली. नागनदीच्या १७ किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील असलेल्या विविध बाबींची महेश गुप्ता यांनी माहिती दिली. पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याबाबत नागनदीच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती एचसीपी डिझाईन कन्सलटंट यांना देण्यात यावी, असे निर्देश दटके यांनी दिले. नागनदी अभियानात सहभागी कार्यकारी अभियंता यांची मते जाणून घ्यावी. त्यानंतर आराखड्याला अंतिम स्वरूप द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच गांधीसागर तलावाच्या मास्टर प्लॅनचे सादरीकरण करण्यात आले. तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत त्या परिसरातील सर्व नगरसेवकांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची सूचना दटके यांनी केली. (प्रतिनिधी)