महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 02:34 IST2015-04-23T02:34:33+5:302015-04-23T02:34:33+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागात बुधवारी दुपारी शिवसेनेच्या नगरसेविका अल्का दलाल ..

महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागात बुधवारी दुपारी शिवसेनेच्या नगरसेविका अल्का दलाल व त्यांचे पती अजय दलाल यांनी गोंधळ घालून एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र दलाल यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला असून कर्मचाऱ्यांनीच असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान झालेल्या घटनेचा महसूल कर्मचारी संघटनेने तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन केल्याने दिवसभर कामकाज ठप्प होते.
प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवसेनेच्या नगरसेविका अल्का दलाल आणि त्यांचे पती अजय यांच्यासह काही कार्यकर्ते व महिला संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात आले. योजनेच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात त्यांच्या काही तक्रारी होत्या. संबंधित लिपिक गैरहजर होता. त्यामुळे त्या दुसऱ्या लिपिकांकडे गेल्या. मात्र त्यांना योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्या संतापल्या व त्यांनी प्रथम नायब तहसीलदार संजय भालेराव व नंतर तहसीलदार रोहिणी पाठराबे यांची भेट घेतली. तेथेही त्यांचे समाधान न झाल्याने दोन्ही अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. अल्का दलाल यांनी अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा व मध्यस्थी करण्यासाठी आलेले कर्मचारी मधुकर साखरे यांना अजय दलाल यांनी मारहाण केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना घटनाक्रमाची माहिती दिली. व्हिडिओ चित्रफितही दाखविली.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद महसूल कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. त्यांनी लगेचच कामबंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर एक शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढे जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सदर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली.
दलालांचा सन्मान लोकप्रतिनिधींचा अवमान
संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात दलालांना सन्मानाची वागणूक दिली जाते तर योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात विचारणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अवमान केला जातो. याचा प्रत्यय मला बुधवारी या कार्यालयात आला. प्रभागातील महिला लाभार्थ्यांच्या अर्जासंदर्भात विचारणा करायला गेली असता मला तेथील अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. जे लिपिक रजेवर आहेत त्यांचे नाव सांगून त्यांना भेटा असे सांगण्यात आले. तक्रारींचा निपटारा करण्याऐवजी ‘तुम्ही कोण’, ‘तुमचे येथे काय काम’ ‘तुम्ही येथून बाहेर व्हा’ अशा उद्धट पद्धतीने कर्मचाऱ्यांनी उत्तरे दिली, एवढेच नव्हे तर पुरुष कर्मचारी मला कार्यालयाबाहेर काढायला आल्यावर मी त्यांना दरडावले. कुणालाही मारहाण केली नाही किंवा कुणाशी बोलताना अपशब्द वापरला नाही. गोरगरीब महिलांना न्याय मिळावा म्हणून मी या कार्यालयात गेले होते. पण येथील दलालांचे साम्राज पाहून संताप आला. यावेळी या कार्यालयात उपस्थित अनेक लाभार्थी महिलांनी त्यांची व्यथा माझ्यापुढे मांडली. तुमच्यासोबतच अधिकारी असे वागत असतील तर सामान्य माणसांचे काय, असा सवाल त्यांनी केला. माझे पती मला सोबत नेण्यासाठी आले होते. त्यांच्यावर काही कार्मचारी धावून आले.
-अल्का दलाल, नगरसेविका, शिवसेना
चर्चेसाठी तयारी होती
संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात काही तक्रार असेल तर त्या सोडविण्यासंदर्भात चर्चा करण्याची तयारी होती. त्यासाठीच दलाल यांना आपल्या कक्षात चर्चेसाठी बोलविले होते. त्यांना संबंधित विभागाचा एक लिपिक रजेवर आहे, हे सुद्धा सांगितले. पण त्या काही ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नव्हत्या व त्यांची भाषा योग्य नव्हती. बाहेर कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.
-रोहिणी पाठराबे
तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना