महसूल दस्तावेज राहणार सुरक्षित
By Admin | Updated: November 23, 2014 00:38 IST2014-11-23T00:38:44+5:302014-11-23T00:38:44+5:30
अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने संग्रहित करून ठेवलेले महसूल दस्तावेज नष्ट होण्याचा धोका असल्याने त्याच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक अशी ‘रेकॉर्ड रूम’तयार

महसूल दस्तावेज राहणार सुरक्षित
जिल्हाधिकारी कार्यालयात अद्ययावत रेकॉर्ड रूम : ‘कॉम्पॅक्टर’ लागले
नागपूर: अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने संग्रहित करून ठेवलेले महसूल दस्तावेज नष्ट होण्याचा धोका असल्याने त्याच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक अशी ‘रेकॉर्ड रूम’तयार करण्याचे काम सुरू आहे. लॉकर्सप्रमराणे ‘कॉम्पॅक्टर’ तेथे लावण्यात येत असून त्यात ही कागदपत्रे सुरक्षित ठेवली जाणार आहे
सेतू केंद्राच्या पहिल्या मजल्यावर रेकॉर्ड रूमचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तेथे कागदपत्रे ठेवण्यासाठी कॉम्पॅक्टर लावण्यात येत असून आतापर्यंत ६० कॉम्पॅक्टर बसविण्यात आले आहेत. त्यात सर्व महसूल दस्तावेज तारीख, वर्ष आणि विभागनिहाय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ती गहाळ होणे किंवा नष्ट होणे याबाबी पुढच्या काळात उद््भवण्याचा धोका नाही.
महसूल खात्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे एक तर गहाळ झालेली असतात किंवा गहाळ तरी केली जातात. अनेक वर्षांपासून धूळखात पडलेली असल्याने ते नष्ट होण्याचाही धोका असतो. त्यामुळेच गत आघाडी शासनाच्याच काळात महसूल दस्तावेजचे स्कॅनिंग करून ते सुरक्षित ठेवण्याबाबत निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते.
या कामाची प्राथमिक स्वरूपाची तयारी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सुरू केली होती. विद्यमान जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी या कामाला गती दिली. सध्या ते अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा राजस्व अभिलेखा कार्यालयाचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
२००६ पासूनची सर्व महत्त्वाच्या दस्तावेजचे स्कॅनिंग करून ते तारीखनिहाय या रेकॉर्ड रूममधील कॉम्पॅक्टरमध्ये ठेवली जातील. त्यामुळे ती सुरक्षित राहतील व गरज पडली तेंव्हा सहज उपलब्ध होईल.
आतापर्यंत ही कागदपत्रे पारंपारिक पद्धतीने म्हणजे गठ्ठे बांधून ठेवली जात होती. त्यावर धूळ बसत असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी पडत असल्याने नष्ट होण्याचा धोका संभवत होता.
दस्तावेज स्कॅन केले जातील व त्यानंतर निश्चित पद्धतीनुसार ते संग्रहित केले जातील. त्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे.
सेतू केंद्रातील विविध प्रमाणपत्रांशी संबंधित सर्व कागदपत्रेही या रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात येणार असून त्यासाठी २००६पासूनची कागदपत्रे वर्ष व तारीखनिहाय लावून ठेवण्यात आली आहेत.
महसूल दस्तावेज स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली असून यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.