व्हॅक्सिन न देताच टीटीईंना केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:18+5:302021-03-13T04:14:18+5:30
नागपूर : प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना व्हॅक्सिन देणे सुरू आहे. परंतु शुक्रवारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ...

व्हॅक्सिन न देताच टीटीईंना केले परत
नागपूर : प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना व्हॅक्सिन देणे सुरू आहे. परंतु शुक्रवारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कोरोना व्हॅक्सिन सेंटरवर पोहोचलेल्या १० टीटीईंना ते फ्रंटलाईन कर्मचारी नसल्याचे सांगून व्हॅक्सिन न देताच परतविण्यात आले. परंतु रेल्वे प्रशासन मात्र लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना परत केल्याचे सांगत आहे.
आरपीएफ कर्मचारी, टीटीई हे फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांत येत असल्यामुळे त्यांना काही दिवसांपासून व्हॅक्सिन देणे सुरू आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयात व्हॅक्सिन देणे सुरू आहे. यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनाही व्हॅक्सिन देणे बंधनकारक आहे. दपूम रेल्वेच्या काही टीटीईंना ते फ्रंटलाईन कर्मचारी नसल्याचे सांगून परत पाठविण्यात आले. याबाबत ऑल इंडिया ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष विश्वकर्मा यांनी कोरोना व्हॅक्सिन केवळ आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे सांगून टीटीईंना परत पाठविणे चुकीचे असल्याचे सांगितले. तर रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष मनोज समर्थ यांनी टीटीई थेट प्रवाशांच्या संपर्कात येत असल्यामुळे त्यांना व्हॅक्सिन देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. टीटीईंना व्हॅक्सिन न देता परत पाठविल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.
............
लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना परत केले
‘लेखा विभागातील कर्मचारी फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये येत नाहीत. त्यामुळे त्यांना परत पाठविण्यात आले. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिन देण्यात येत आहे. आज ज्या टीटीईंना परत पाठविण्यात आले ते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे आहेत. टीटीईंची बॅच बनवून त्यांना व्हॅक्सिन घेण्यासाठी पाठविण्याबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रशासनाला सांगण्यात आले आहे. त्यांनाही व्हॅक्सिन देण्यात येईल.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग
..........