खळबळजनक! सेवेत नसलेल्या व्यक्तीच्या नावावर लाटले लाखोंचे सेवानिवृत्ती वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 21:08 IST2022-01-13T21:07:38+5:302022-01-13T21:08:02+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या सेवेत नसलेल्या व्यक्तीचे नाव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या यादीत टाकून त्याच्या नावावर पैशाची उचल होत असल्याचा भंडाफोड काटोल नगर परिषदेत झाला आहे.

खळबळजनक! सेवेत नसलेल्या व्यक्तीच्या नावावर लाटले लाखोंचे सेवानिवृत्ती वेतन
नागपूर : काटोल नगर परिषदेच्या सेवेत नसलेल्या व्यक्तीचे नाव सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या यादीत टाकून त्याच्या नावावर पैशाची उचल होत असल्याचा भंडाफोड काटोल नगर परिषदेत झाला आहे. याप्रकरणी लेखा विभागातील कनिष्ठ शिक्षण लिपिक मनोज दामोधर वाघ याला मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी निलंबित केले आहे. वाघ याने बनावट खात्यावर ही रक्कम वळती करत गेल्या दीड वर्षात ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघ हा नगर परिषदेच्या लेखा विभागात कनिष्ठ शिक्षण लिपिक पदावर कार्यरत आहे. त्याने नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या यादीत एक अधिकचे डमी नाव टाकले. यासोबतच त्या नावाचे बँक खाते उघडण्यात आले. त्या खात्यात दर महिन्याला सेवानिवृत्ती वेतनसुद्धा जमा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम बँक खात्यात जमा झाली की, डमी बँक खातेदार उचल करून आपसात वाटून घेत होते. गत दीड वर्षापासून हा गोरखधंदा सुरू होता.
हयात प्रमाणपत्राने झाली पोलखोल
सेवानिवृत्त कर्मचारी हयात असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झालेल्या कार्यालयात डिसेंबर महिन्यात जमा करावे लागते. यंदा पालिका प्रशासनाला सर्व सेवनिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. मात्र, एका कर्मचाऱ्याचे प्रमाणपत्र आढळले नाही. याची सखोल चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.