नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:40 AM2019-11-29T10:40:43+5:302019-11-29T10:41:22+5:30

उच्चशिक्षित निवृत्त अधिकाऱ्याला विदेशात लठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी ५७ लाखांचा गंडा घातला.

Retired officer of Nagpur for Rs | नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याला ५७ लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देविदेशात नोकरीचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्चशिक्षित निवृत्त अधिकाऱ्याला विदेशात लठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी ५७ लाखांचा गंडा घातला. अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतराम उद्धव सहारे (वय ७२) असे तक्रारदारांचे नाव आहे. ते अमरावती रोडवरील टिळकनगरात हिमालय आर्केड अपार्टमेंटमध्ये राहतात. सहारे दोन वर्षांपूर्वीपर्यंत भारतातील विविध राज्यात पल्स अँड पेपर इंड्रस्ट्रीजमध्ये टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून सेवारत होते. त्यानंतर ते इंडोनेशियात गेले. तेथे एका पेपर इंडस्ट्रिजमध्ये याच पदावर ते कार्यरत होते. २०१७ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर ते भारतात परतले. सध्या टिळकनगरात मुलगा आणि ते राहतात. आॅगस्ट महिन्यात ते ऑनलाईन असताना त्यांना एक मेल दिसला. कॅनडातील एका कंपनीत टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून लठ्ठ पगाराच्या नोकरीची ऑफर त्यांना या मेलमधून देण्यात आली होती. ती स्वीकारल्यानंतर त्यांना त्यासाठी स्पेशल व्हिजा आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. दरम्यान ऑनलाईन संपर्क वाढल्यानंतर क्रेग बिक्सा नामक व्यक्तीने स्वत:ला कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ असल्याचे सांगत सहारेंसोबत संपर्क केला. त्यांनी व्हिसा तयार करण्यासाठी आणि अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चेस्टा ब्राऊन नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. चेस्टाने वेळोवेळी सहारे यांना फोन करून वेगवेगळ्या कामासाठी कधी एक लाख तर कधी दोन लाख रुपये मागितले. ही संपूर्ण रक्कम जॉईन होताच परत मिळणार अशी हमी कंपनीच्या सीईओने दिली होती. यापूर्वीही इंडोनेशियात नोकरी जॉईन करण्यापूर्वी हीच प्रक्रिया झाल्यामुळे सहारे यांनी ११ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०१९ या दरम्यान ५६ लाख ६७ हजार रुपये चेस्टा आणि ब्रिक्स तसेच डेविड नामक व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ट्रान्सफर केले. दरम्यान, सारखी सारखी पैशाची मागणी होत असल्याने सहारे यांना शंका आली. त्यांनी परत रक्कम जमा करण्यास नकार दिला. आपल्याला नोकरी नको आपली रक्कम परत पाठवा, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आरोपींनी त्यांना एक विशिष्ट रक्कम जमा करा. त्यानंतर आमचा माणूस तुमची सर्व कागदपत्रे घेऊन भारतात येईल. तुमची तो भेट घेईल. त्याच्याजवळ तुम्ही आतापर्यंत खर्च केलेली संपूर्ण रक्कम विदेशी चलनाच्या (फॉरेन्स करन्सी) रूपात असेल. ती तुम्हाला तो परत करेल, अशीही थाप सायबर गुन्हेगारांनी सहारेंशी बोलताना मारली.

अन् शंकेची पाल वळवळली
कोणत्याही व्यक्तीला एवढी मोठी रक्कम फॉरेन्स करन्सीच्या रूपात परक्या देशात नेता येत नसल्याचे माहीत असल्यामुळे आपली फसवणूक करण्यात आल्याची सहारे यांची शंका घट्ट झाली. त्यांनी लगेच सायबर शाखेत धाव घेतली. तेथे तक्रार नोंदविल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यानंतर आरोपींकडून संपर्क तोडण्यात आला. त्यामुळे सहारे यांनी बुधवारी अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक अचल कपूर यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. विदेशात लठ्ठ पगार मिळतो. शिवाय आप्तस्वकियांमध्येही मानाचे स्थान मिळते. त्यामुळे विदेशी नोकरीचे अनेकांना आकर्षण असते. हे हेरून सायबर गुन्हेगारांनी विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार अवलंबला आहे. त्यांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. सायबर गुन्हेगार फसवणूक करताना असे काही तंत्र अवलंबतात की त्यांच्याकडे पाठविलेली रक्कम परत मिळणे तर सोडा त्यांचा छडा लावणेही पोलिसांसाठी कठीण होते.

Web Title: Retired officer of Nagpur for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.