अभियांत्रिकीचे निकाल ३१ जुलैपूर्वी
By Admin | Updated: July 14, 2015 03:17 IST2015-07-14T03:17:20+5:302015-07-14T03:17:20+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच असून सोमवारपर्यंत ४१

अभियांत्रिकीचे निकाल ३१ जुलैपूर्वी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही रखडलेलेच असून सोमवारपर्यंत ४१ टक्के निकाल जाहीर झाले. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांचे निकाल जाहीर झाले असले तरी, अभियांत्रिकीच्या सम सत्रांचे निकाल अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. ३१ जुलैपुर्वी अभियांत्रिकीचे सर्व निकाल जाहीर करण्यात येतील, असे आश्वासन प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले.
‘अॅकेडॅमिक कॅलेंडर’नुसार नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू झाले. शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण होत आला. परंतु प्रत्यक्षात अजूनही ६० टक्के निकाल रखडलेलेच आहेत. यासंदर्भात प्र-कुलगुरूंना विचारणा केली असता, मूल्यांकनाचे काम आता आणखी वेगात सुरू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. मूल्यांकनाला प्राध्यापक येत नसल्याची बाब लक्षात येताच प्राचार्यांची बैठक घेण्यात आली व त्यात त्यांच्यासमोर पूर्ण परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर मूल्यांकनासाठी प्राध्यापक मंडळी मोठ्या प्रमाणात येत आहेत. अभियांत्रिकीचे मूल्यांकनदेखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे व ३१ जुलैपूर्वी सर्व निकाल जाहीर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोमवारच्या दिवशी १५ हून अधिक निकाल जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, फेरमूल्यांकनाचे निकाल गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले आहेत. यासंदर्भात मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांना तांत्रिक सहकार्यदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. १५ आॅगस्टपूर्वी फेरमूल्यांकनाचे निकालदेखील जाहीर करण्यात येतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
आज परीक्षा मंडळाची तातडीची बैठक
दरम्यान, मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये चुका किंवा त्रुटी आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, ५ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाची नियमित बैठक होणार आहे.