विद्यार्थ्यांवर निकालात गुणांची बरसातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:04+5:302020-11-28T04:07:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूरर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचे सुमारे साडेसातशे निकाल जाहीर झाले आहेत. आतापर्यंत ...

विद्यार्थ्यांवर निकालात गुणांची बरसातच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूरर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचे सुमारे साडेसातशे निकाल जाहीर झाले आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनी विद्यार्थ्यांना मोठे सरप्राईजच दिले आहेत. एरवी विद्यापीठात कमी गुण मिळतात अशी विद्यार्थ्यांची ओरड होती. मात्र वस्तुनिष्ठ व ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांवर अक्षरशः गुणांचा वर्षाव झाला आहे.
कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा लांबल्या. ऑनलाईन माध्यमातून या परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठीदेखील ही प्रणाली नवीनच होती. विद्यार्थ्यांना ५० पैकी २५ प्रश्नांची बहुपर्यायी उत्तरे द्यायची होती. शिवाय पेपर घरी बसवून सोडविला होता. मात्र विद्यापीठाचा एकूण इतिहास पाहता निकालाबाबत विद्यार्थी साशंकच होते. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वसाधारण बुध्दिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहे. साधारणतः पदव्युत्तर अभ्यासक्रमांत प्रावीण्य श्रेणी मिळविणेदेखील मोठी बाब असते. परंतु अनेक अभ्यासक्रमांत विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
१०० टक्केदेखील गुण
काही विद्यार्थ्यांना चक्क १०० टक्के गुणदेखील प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण यात जास्त आहे.
मूल्यांकनावर प्रश्न
इतक्या जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना गुण मिळाले असल्यामुळे मूल्यांकनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. परंतु बहुपर्यायी उत्तरे देत असताना विद्यार्थ्यांना जास्त अडचण झाली नाही. अशी माहिती एका प्राचार्यांनी दिली. तर विद्यापीठात नियमांनुसारच मूल्यांकन झाले असून कुणालाही गुण देताना उदारता दाखविण्यात आलेली नाही. परीक्षेचे स्वरूप बदलले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरे देताना जास्त ताण आला नाही, असे मत परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी व्यक्त केले.