आरोप असलेल्या विभाग प्रमुखावर चौकशीची जबाबदारी
By Admin | Updated: July 7, 2015 02:31 IST2015-07-07T02:31:38+5:302015-07-07T02:31:38+5:30
अधिकारी वा विभागावर घोटाळ्याचा आरोप झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविली जाते.

आरोप असलेल्या विभाग प्रमुखावर चौकशीची जबाबदारी
संगणक घोटाळा : वृत्तामुळे मनपात खळबळ
नागपूर : अधिकारी वा विभागावर घोटाळ्याचा आरोप झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविली जाते. परंतु महापालिकेत घोटाळ्यात सहभागी असलेल्या विभागाच्या चौकशीची जबाबदारी त्याच विभागाच्या प्रमुखाकडे सोपविण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येणाऱ्या नागरी सुविधा केंद्रांना संगणक व साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. बाजारभावाच्या तुलनेत अधिक दराने या साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच मनपा प्रशासनात खळबळ उडाली. नागरी सुविधा के ंद्राचे प्रमुख आर.एस.कांबळे यांना सामान्य प्रशासन विभागात बोलावण्यात आले. संबंधित साहित्याचे शासकीय दरकरार व बाजारभाव यातील फरकाची माहिती घेण्याचे त्यांना सांगण्यात आले. वास्तविक आयुक्तांनी दर कराराला २ सप्टेंबर २०१४ रोजी मंजुरी दिली होती. त्यावर कांबळे व सामान्य प्रशासन विभागप्रमुख महेश धामेचा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु दरकरार निश्चित करताना बाजारभाव विचारात घेण्यात आले होते का असा प्रश्न आहे. वास्तविक दरकरार मूळ किमतीच्या चार टक्के कमी दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (प्रतिनिधी)
दुय्यम दर्जाचे साहित्य
पुरवठा करण्यात आलेले काही संगणक व साहित्य दुय्यम दर्जाचे आहे. संगणकासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करताना या विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. अनियमिततेला आळा घालायचाच असेल तर पुरवठा करण्यात आलेल्या साहित्याचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे.
चांगले संगणक भंगारात
चांगले संगणक नादुरुस्त असल्याचे भासवून नागरी सुविधा केंद्राने ते भंगारात टाकले. नंतर ही सामग्री लिलावात काढण्यासाठी विभागाने स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु सदस्यांनी आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.