वैदर्भीय सांस्कृतिक परंपरांचा सन्मान व्हावा

By Admin | Updated: November 21, 2015 03:26 IST2015-11-21T03:26:19+5:302015-11-21T03:26:19+5:30

कालिदास विदर्भाचे पाहुणे म्हणून आले आणि रामटेकमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अजरामर कलाकृतीने रामटेकचे नाव साहित्याच्या इतिहासात कोरले गेले.

Respect for Vedral cultural traditions | वैदर्भीय सांस्कृतिक परंपरांचा सन्मान व्हावा

वैदर्भीय सांस्कृतिक परंपरांचा सन्मान व्हावा

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार : कालिदास महोत्सवाचे थाटात उद्घाटन
रामटेक : (कालिदास स्मारक) : कालिदास विदर्भाचे पाहुणे म्हणून आले आणि रामटेकमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या अजरामर कलाकृतीने रामटेकचे नाव साहित्याच्या इतिहासात कोरले गेले. मोठा आणि महान कवी हा कुठल्याच प्रदेशाचा नसतो. तो साऱ्या जगाचा असतो. महान कवी, नाटककार कालिदासाचे स्मरण आपण करतो आहोत, ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. विदर्भाचा माणूस जरा मुजोर असतो पण मुजोरी करण्यासाठी ज्ञानही असावे लागते. आपल्या वैदर्भीय सांस्कृतिक समृद्ध इतिहासाच्या परंपरेचे आपल्यालाच कायम ज्ञान नाही. कालिदासाचे स्मरण करताना संस्कृतचा महान वैदर्भीय कवी भवभूतीला विसरुन चालणार नाही. आपल्या वैदर्भीय सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करायला आपण शिकले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी शुक्रवारी केले.
कालिदास महोत्सव आयोजन समिती, जिल्हा प्रशासन, राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कालिदास महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य, विभागीय आयुक्त अनुपकुमार, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माजी आ. आशिष जयस्वाल, माजी राज्यमंत्री मधुकरराव किंमतकर, चंद्रपाल चौकसे, पांडुरंग हजारे, आनंदराव देशमुख, रामटेकचे सभापती किरण धुर्वे, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, नगराध्यक्ष नलिनी चौधरी, साहित्यिक विष्णू खरे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पियुषकुमार उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन कालिदास स्मारकाच्या शेजारील प्रांगणात करण्यात आले.
महेश एलकुंचवार म्हणाले, कालिदास हा संस्कृतचा महान कवी होता पण तो संस्कृतमधला पहिला कवी नाही. कालिदासाच्या आत्मविश्वासाचे कौतुकच करयला हवे कारण त्यो मांडलेल्या भावना सार्वत्रिक आहेत आणि आजही ताज्या आहेत. त्यामुळेच कालिदास आपल्याला आजही जवळचा वाटतो. त्याचे जीवनावरचे प्रेम आणि निसर्गाचे प्रेम विलक्षण आहे. कुमारसंभवम मध्ये लज्जेचा अप्रतिम आविष्कार त्याने मांडला आहे. कालिदासाचे हे साहित्य जनतेपर्यंत पोहोचवून आपले जीवन कालिदासाने किती समृद्ध केले ते लोकांनाही कळायला हवे. त्यासोबतच कालिदासाचे स्मरण करताना भवभूतीसाठी आपण काहीच का करीत नाही. तो आपल्याला माहितीही नाही. त्याचे स्मारक बांधा, असे मी म्हणणार नाही पण भवभूतीच्या नावाने काही तरी विदर्भात व्हायला हवे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कालिदासाच्या काव्याने जी सांस्कृतिक दृष्टी आपल्याला दिली त्याचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. कालिदासाचे वास्तव्य जेथे राहिले त्या रामटेकमध्येच कालिदासाच्या नावाने सुरु झालेले कार्यक्रम झाले पाहिजेत, हे शासनाला मान्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी रामटेकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. रामटेककरांच्या जे मनात असेल तेच शासन करेल. येणाऱ्या पिढीच्या मनात कालिदास कसा रुजविता येईल, याचा प्रयत्न शासन करीत आहे. शासनाला रामटेकमध्ये बरीच कामे करायची आहेत. त्यात सूचना आल्याप्रमाणे कालिदास स्मारकात ग्रंथालय, कालिदासाचा भव्य पुतळा आदींचे काम सुरु आहे. या ग्रंथालयात कालिदासाच्या संपूर्ण कलाकृती आणि त्यावरचे संशोधन ठेवण्यात येईल, अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
डॉ. उमा वैद्य यांनी प्रास्ताविकातून या महोत्सवाला यंदापासून नवी झळाळी आली आहे. त्यानिमित्ताने कालिदास संस्कृत विद्यापीठाचा परिसरही सुशोभित करण्यात आला आहे. रामटेकमध्ये पडलेले रामाचे पाऊल, कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि नगरधनचा किल्ला तसेच निसर्गसौंदर्य हे रामटेकचे वैभव आहे. है वैभव या महोत्सवाच्या निमित्ताने अधिक समृद्ध करण्याता प्रयत्न होतो आहे. संचालन श्वेता शेलगावकर अणि आभार रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Respect for Vedral cultural traditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.