मातृभूमीच्या सन्मानाला मोल नसते
By Admin | Updated: September 8, 2015 05:22 IST2015-09-08T05:22:20+5:302015-09-08T05:22:20+5:30
आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला

मातृभूमीच्या सन्मानाला मोल नसते
नागपूर : आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला त्यागसुद्धा अनमोल असतो. त्याचे मूल्य मागता येत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. देशभरात माजी सैनिकांनी ‘वन रॅँक वन पेन्शन’ साठी केलेले आंदोलन, म्हणजे मातृभूमीच्या सन्मानासाठी सैनिकांनी केलेल्या त्यागाचा मोबदला मागत असल्याची अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली.
प्रहार मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित १९६५च्या भारत-पाक युद्धातील सैन्य अधिकाऱ्यांचा सत्कार सोमवारी रविनगर येथील संस्थेच्या सभागृहात करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. भागवत यांच्या हस्ते ग्रुप कॅप्टन एस.व्ही. फाटक, कर्नल विष्णू वडोदकर व कर्नल सुनील देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोहन भागवत यांनी सैनिकांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. १९६५ च्या युद्धात अपुऱ्या युद्ध संसाधनातही सेनेने जी कामगिरी केली ती भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. मातृभूमीसाठी युद्ध करणाऱ्या सेनिकांमध्ये मातृभूमीबद्दलची भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. मातृभूमीच्या भक्तीमुळेच त्यांना जिंकण्याचे बळ मिळते.
देशासाठी, समाजासाठी आपले आयुष्य वाहून टाकणाऱ्यांचाच गौरव होतो. वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण होते. पैशासाठी, सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्यांना समाजही तेवढ्याच लवकर विसरतो.
सैनिकांच्या सन्मानाचे हे कार्यक्रम नियमित होणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात उपस्थित सत्कारमूर्तींनी १९६५ च्या युद्धाचे थरारक अनुभव उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुमिता जाना यांनी केले तर आभार शिवाली देशपांडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
लक्ष्य होते शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे
४कर्नल सुनील देशपांडे यांच्या सेकंड मराठा तुकडीने फिरोजपूर लाहोर सीमेवर पाकिस्तानी आक्रमण थोपविण्याचे आणि हुसैनीवाला पूल व भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या समाधीस्थळाची सुरक्षेची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी अतिशय चोख पार पाडली. कमांडचा आर्डर हुसेनीवाला पुलाच्या सुरक्षेचा असला तरी, तुकडीतील प्रत्येक सैनिकाला शत्रूला नेस्तनाबूत करायचे होते. ही कामगिरी पार पाडून शत्रूचे टॉवर सैनिकांनी उद्ध्वस्त केले. ग्रुप कॅप्टन श्रीकृष्ण फाटक हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट होते. १९६५ च्या युद्धात त्यांनी लढाऊ विमान शत्रूच्या क्षेत्रात नेऊन प्रत्युत्तर दिले होते. लढाईच्या काळात त्यांच्या विमानाला रॉकेटची धडक झाल्याने आकाशात विमानाने पेट घेतला. पॅराशूटच्या मदतीने भारताच्या भूमीवर परतले. कर्नल विष्णू वडोदकर यांनी १९६५ च्या युद्धात रेजिमेंट ८५ इन्फेंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले. पाकिस्तानी आर्टिलरी फायरिंगला सडेतोड उत्तर दिले.
सेनेत अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहे
सीमेवर तैनात राहून देशाची सुरक्षा करणाऱ्या भारतीय सेनेच्या जवानांनी शत्रूच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली नसती, तर आपणही अस्तित्वहीन असतो. मातृभूमीच्या भक्तीपोटी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचा गौरव करताना, त्यांचे अनुकरण आपण करायला हवे. आज बक्कळ पैसा कमविण्यासाठी मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनविण्याचा पालकांचा अट्टहास आहे, त्यामुळे मातृभूमीबद्दलचे प्रेम आटले आहे. परिणामी सेनेतील अधिकाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची खंत मोहन भागवत यांनी व्यक्त केली.