आरक्षणावर आक्षेपांचा पाऊस
By Admin | Updated: October 26, 2016 03:08 IST2016-10-26T03:08:15+5:302016-10-26T03:08:15+5:30
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये ठरविण्यात आलेल्या जातीनिहाय आरक्षण व इतर बाबींवर आक्षेपांचा पाऊस पडला आहे.

आरक्षणावर आक्षेपांचा पाऊस
मनपा निवडणूक : २५ आॅक्टोबरपर्यंत होती मुदत
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये ठरविण्यात आलेल्या जातीनिहाय आरक्षण व इतर बाबींवर आक्षेपांचा पाऊस पडला आहे.
प्रभागाच्या सीमा व आरक्षण निश्चित करण्यात आल्यानंतर १० ते २५ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. अंतिम दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत ४७ आक्षेप व सूचना नोंदविण्यात आल्या. यात जातीनिहाय आरक्षणासह प्रभागाच्या सीमा, नाव इत्यादीवर नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. निवडणूक विभाग, आयुक्त कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग व झोन कार्यालयात आक्षेप व सूचना स्वीकारण्यात आल्या. ४७ आक्षेप व सूचना दुपारी ४ वाजतापर्यंतच्याच असल्यामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग कापल्या गेल्याचे आक्षेप विरोधी पक्षासह सत्तापक्षातीलही अनेक नगरसेवकांनी नोंदविले आहेत. विधानसभा मतदार संघाच्या आधारावर प्रभाग निश्चित करण्यात आले नसल्यामुळे पूर्व मतदार संघातील उत्तर भागातून, दक्षिण मतदार संघातील मध्य भागातून तर, दक्षिण-पश्चिम मतदार संघातील दक्षिण भागातून प्रभाग कापल्या गेले आहेत. यामुळे नागरिकांना तक्रारींचे निराकरण करण्यास त्रास होईल, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. उत्तर नागपुरातील अनेक प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ५० ते ६० टक्के आहे. परंतु, या प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी एकच जागा आरक्षित करण्यात आली आहे. तसेच, अनेक प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या नाममात्र असताना अनुसूचित जातीसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
प्रभागांना नाव नसल्यामुळे समस्या
३८ प्रभागांतील १५१ जागांसाठी २०१७ मध्ये निवडणूक होईल. प्रभागांना नावाऐवजी क्रमांक देण्यात आले आहेत. यावर अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. क्रमांकामुळे प्रभाग ओळखण्यास अडचण होईल. यामुळे प्रभागांना नाव देणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.