शिक्षण सेवकांच्या मानधनाचा प्रश्न निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:11+5:302021-02-20T04:20:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवकांना मानधनासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेल्या चार ...

शिक्षण सेवकांच्या मानधनाचा प्रश्न निकाली काढा
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवकांना मानधनासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. गेल्या चार महिन्यापासून मानधनाविनाच अध्यापनाचे कार्य करावे लागत असून, त्यांच्या मानधनाचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना साेपविले आहे.
जिल्ह्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरळ सेवेची शिक्षण सेवक संवर्गाची विशेष पदभरती मोहीम २०१९-२०२० अंतर्गत शिक्षक अभियोग्यता चाचणी (टीईटी/सीटीईटी) उत्तीर्ण व अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा(टीएआयटी)मधील गुणांच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ४६ उमेदवारांना प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून दरमहा ६,००० रुपये मानधनावर २० ऑक्टाेबर २०२० च्या आदेशान्वये नियुक्ती देण्यात आली.
हे शिक्षक जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये रुजू होऊन अध्यापनाचे कार्य करीत आहेत. असे असतानाही नियुक्तीपासून चार महिने उलटूनसुद्धा या शिक्षण सेवकांना अजूनही मानधन देण्यात आले नाही. ही बाब न्यायसंगत नाही. त्यामुळे या शिक्षण सेवकांचे मानधन तातडीने देण्याची मागणी संघाने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे गोपाळ चरडे, रामू गोतमारे, सुनील पेटकर, सुभाष गायधने, धनराज बोडे, आनंद गिरडकर, गजेंद्र कोल्हे, अशोक बावनकुळे, वीरेंद्र वाघमारे, लोकेश सूर्यवंशी, दिलीप जिभकाटे, अशोक डोंगरे, उज्ज्वल रोकडे, प्रकाश बांबल, संजय शिंगारे, विजय बिडवाईक, अनिल दलाल, जागेश्वर कावळे, मनोहर बेले, आशा झिल्पे, सिंधू टिपरे आदी उपस्थित हाेते.