निवासी डॉक्टरांचा संप मागे

By Admin | Updated: July 4, 2015 03:13 IST2015-07-04T03:13:43+5:302015-07-04T03:13:43+5:30

इन्टर्नशिप (आंतरवास) करणाऱ्या डॉक्टरांना त्रास देत असलेल्या नागपूर येथील

Resident doctors retreat | निवासी डॉक्टरांचा संप मागे

निवासी डॉक्टरांचा संप मागे


नागपूर : इन्टर्नशिप (आंतरवास) करणाऱ्या डॉक्टरांना त्रास देत असलेल्या नागपूर येथील तत्कालीन विभाग प्रमुखांच्या विरोधात एका महिन्यात विभागीय चौकशी अहवाल तयार करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रस्तावित वेतनवाढ, रजा, बॉण्ड या व इतर मागण्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, या वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्वासनामुळे गुरुवारपासून संपावर गेलेल्या सेंट्रल मार्डने शुक्रवारी सायंकाळी संप मागे घेतला.
शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी व विनोद तावडे हे नागपूरच्या मेडिकलमध्ये, मेडिकल, मेयो व डागा रुग्णालयाच्या समस्यांचा आढावा घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा संप मागे घेण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.
रुग्णांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे मेडिकल व मेयोचा निवासी डॉक्टर कणा आहेत. गुरुवार सकाळी ८ वाजतापासून मेडिकलचे ४०० तर मेयोचे २५० डॉक्टर संपावर गेले होते. मात्र, ३६ तासांतच हे डॉक्टर आपल्या कामावर परतल्याने रुग्णसेवेवर याचा फारसा प्रभाव पडलेला नाही. विशेष म्हणजे, मेयो व मेडिकलने या संपाचे योग्य नियोजन केल्याने संपाचा फटका जाणवला नाही.
शुक्रवारी सायंकाळी सेंट्रल मार्डने संप मागे घेतल्याने या दोन्ही रुग्णालयाच्या प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन्ही रुग्णालयातील निवासी डॉक्टर ‘ड्युटी पोजिशन’ लक्षात घेत रात्री ८ वाजतापर्यंत कामाचा चार्ज घेतला होता. शुक्रवारी दिवसभरात या दोन्ही रुग्णालयात नेहमीच्या तुलनेत ओपीडी कमी झाली होती. तातडीच्या शस्त्रक्रिया सोडल्यास इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Resident doctors retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.