दोन दिवसात रेल्वेचे १२०० आरक्षण रद्द
By Admin | Updated: July 31, 2015 02:51 IST2015-07-31T02:51:13+5:302015-07-31T02:51:13+5:30
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्याचा..

दोन दिवसात रेल्वेचे १२०० आरक्षण रद्द
याकूबच्या फाशीची धास्ती : घातपाताची भीती
नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्याचा निर्णय झाल्यामुळे उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. फाशीच्या शिक्षेमुळे असामाजिक तत्त्व रेल्वेस्थानकात घातपात घडवून आणतील, अशी भीती वाटल्यामुळे २८ जूनला ५७७ तर २९ जूनला ६४० अशा १२१७ प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केल्याची माहिती आहे. यामुळे रेल्वेला तब्बल ६ लाख ७१ हजार ३७२ रुपये परत करण्याची पाळी आली.
याकूब मेमनला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्याचा निर्णय झाल्यानंतर उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. फाशीच्या निर्णयाचा निषेध म्हणून असामाजिक तत्त्व कुठलीही अप्रिय घटना घडवून आणू शकण्याची शक्यता होती. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. घातपात घडविण्याची सर्वात सोयीची जागा म्हणजे रेल्वेस्थानक आहे. नागपूर रेल्वेस्थानक देशातील संवेदनशील समजल्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. देशात कुठेही बॉम्बस्फोटाची घटना घडल्यास नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जाहीर करण्यात येतो. त्यामुळे याकूबच्या फाशीच्या निर्णयामुळे रेल्वेस्थानकावर किंवा रेल्वेगाडीत घातपात घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीसही त्या दृष्टीने सतर्क झाले होते. मागील पाच ते सात दिवसांपासून रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वानपथक, अत्याधुनिक शस्त्रधारी पोलीस, प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात येत होती. ही सर्व सुरक्षा व्यवस्था पाहून २८ जुलैला रेल्वेने प्रवास करणाऱ्या ५७७ प्रवाशांना या कालावधीत प्रवास करणे असुरक्षित वाटले आणि त्यांनी आपले तिकीट रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रेल्वेला त्यांना ३ लाख २३ हजार ९३३ रुपये परत करावे लागले. तर २९ जुलैला तब्बल ६४० प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले. रेल्वेने त्यांना ३ लाख ४७ हजार ४३९ रुपये परत केले. दरम्यान याकूबला फाशी दिलेल्या ३० जुलैला किती प्रवाशांनी तिकीट रद्द केले याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने उपलब्ध होऊ शकली नाही.(प्रतिनिधी)