संताप...तणाव अन् आक्रोश

By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:15+5:302015-12-05T09:10:15+5:30

कामगारनगरातील चिमुकल्यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावत संतप्त जमावाने बहिणभावाची अंत्ययात्रा जरीपटका ठाण्यावर नेली.

Resentment ... tension and resentment | संताप...तणाव अन् आक्रोश

संताप...तणाव अन् आक्रोश

जरीपटका ठाण्यावर मोर्चा
चिमुकल्यांचा जीव गेला : पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप
नागपूर : कामगारनगरातील चिमुकल्यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावत संतप्त जमावाने बहिणभावाची अंत्ययात्रा जरीपटका ठाण्यावर नेली. शव रस्त्यावर ठेवून ठाण्यासमोरच्या मार्गावरची वाहतूक तब्बल दोन तास रोखून धरत जमावाने पोलिसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला व आरोपीला फाशी द्या, अशी मागणी लावून धरली. या प्रकारामुळे जरीटपटका ठाण्यासमोर स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भावनिक आवाहन करीत संतप्त जमावाची कशी बशी समजूत काढली. त्यानंतर मृत बहीण-भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जरीपटक्यातील कामगारनगरात राहाणारे अकबरी खान मोहम्मद इलियाज (वय १३) आणि नुरैन अन्सारी मोहम्मद इलियाज (वय ११) या बहीण-भावांची त्यांचा नराधम मामा कुतुबुद्दीन ऊर्फ सुहानी अन्सारी (वय २६) सिवनी जिल्ह्यातील छत्तरपूर (मध्य प्रदेश) याने अपहरण करून हत्या केली आहे. आरोपी अन्सारीने २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता अकबरी आणि नुरैन या दोघांना आपल्या मोटरसायकलवर (एमएच ३१/डीवाय २७५२) बसवले. ताजबागमधून फिरून येऊ, असे म्हणत आरोपीने भाच्यांना सोबत नेले, मात्र नंतर तो परतच आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे अपहृत बालकांचे वडील इलियाज यांनी २८ नोव्हेंबरला जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
मात्र, तपासाबाबत तत्परता दाखवली नाही. तिकडे नराधम अन्सारीने भाच्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीच्या पात्रात फेकून तो पळून गेला. २८ नोव्हेंबरला मृतदेह मिळाल्यानंतर छपरा पोलिसांनी ओळख पटविण्याची तसदी न घेता मृतदेहावर अंत्यसंस्कारही करून टाकले. दरम्यान, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मृत बालकांची माहिती कळाल्याने मुलांचे वडील छपरा ठाण्यात पोहचले. त्यानंतर छपरा पोलिसांनी जरीपटका ठाण्यात संपर्क करून बालकांची छायाचित्रे मागवून घेतली. त्यानंतर या हृदयद्रावक प्रकरणाचा उलगडा झाला.
कामगारनगर सुन्न, ठाण्यासमोर
स्फोटक स्थिती

बहीण भावाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे कामगारनगर, कपिलनगर सुन्न झाले. सकाळपासूनच या भागातील नागरिक मृतदेह नागपुरात येण्याची वाट बघत होते. दुपारी २.३० च्या सुमारास मृतदेह घेऊन नातेवाईक कामगारनगरातील घरी पोहचले. त्यानंतर या निरागस जीवांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तेव्हा नातेवाईकच नव्हे तर अनेक महिला-पुरुष, मुले अक्षरश: ढसाढसा रडत होते. सुमारे दीड ते दोन हजारांचा जमाव असलेली अंत्ययात्रा जरीपटका ठाण्यावर आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके तसेच प्रवीण पोटे, राकेश निकोसे विशाल साखरे, कुद्दूस अन्सारी, पंकज जाधव, मनोज कोंडापूरवार यांच्यासह संतप्त जमावाने पोलिसांविरोधात नारेबाजी केली.वेळीच आरोपींचे कॉल डिटेल्स काढले असते तर ही वेळच आली नसती, असा आरोप करून दोषी पोलिसांवरही कारवाईची मागणी केली.

Web Title: Resentment ... tension and resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.