निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक एकर जागेत १७ ते १८ क्विंटलचे उत्पादन देणाऱ्या धानाला सर्वोत्तम प्रजातीचा धान समजला जातो. पाच ते सहा क्विंटलपासून वाढलेले हे उत्पादन १८ क्विंटलपर्यंत पोहचले आहे. मात्र अस्तित्वात असलेल्या या प्रजातींची ही उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी रासायनिक खते, कीटनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही.मात्र तळोधी, बाळापूरच्या अण्णासाहेब पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत रासायनिक खतांऐवजी ऑर्गेनिक पद्धतीने एकराला २५ ते २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाची प्रजाती विकसित केली आहे. तळोधी हिरा-१२५ या नावाच्या या प्रजातीवर सध्या ट्रायल सुरू असून, येत्या दोन वर्षात ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तळोधी परिसरात १४ एकरच्या शेतात धानाचे नवनवे सर्वोत्तम वाण विकसित करण्याचे प्रयत्न गेल्या १६ वर्षांपासून सुरू आहेत. शेतकरी आणि शास्त्रज्ञ असा समन्वय ठेवून बार्कचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार आणि पीकेव्ही, अकोलाचे डॉ. आनंद मुकेवार यांच्या मार्गदर्शनात आसावरी व नीलेश पोशेट्टीवार हे या फार्म प्रयोगशाळेचे काम चालवीत आहेत. बीजोत्सवांतर्गत महिला शेतकरी संमेलनात आसावरी यांनी या संशोधनाबाबत माहिती दिली. शेतामधल्या वेगळ्या प्रकारच्या धानाची फार्म प्रयोगशाळेत लागवड केली जाते. त्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून धानाचे पूर्णविकसित लोंब कव्हर करून टॅग करण्यात येते.आलेल्या धान्यातून निकृष्ट धान बाजूला करून पुन्हा त्याची लागवड केली जाते. अशा तीन-चार प्रक्रियेनंतर विकसित झालेल्या सर्वोत्तम प्रजातींची १५० एकरच्या शेतात वेगवेगळी लागवड केली जाते. या प्रयोगात निर्धारित क्षमता सिद्ध झाली की हे विकसित वाण शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे आसावरी यांनी सांगितले. पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत गेल्या १६ वर्षात ‘पार्वती चिन्नोर, पार्वती सूत-२७, बासमती-३३, साईभोग’ या सुवासिक आणि ‘तळोधी हिरा-१३५’ या सुगंधित नसलेल्या धानाची प्रजाती विकसित केली आहे.याशिवाय आरोग्यास अतिलाभदायक असलेली ‘तळोधी रेड-२५’ हा लाल रंगाचा धानही विकसित करण्यात आला आहे. हे सर्व धान कमी दिवसात आणि अल्प पाण्यात पिकणारे ऑर्गेनिक धान असल्याचे आसावरी यांनी स्पष्ट केले. लवकरच सर्वात कमी म्हणजे १२५ दिवसात पिकणारा ‘तळोधी हिरा-१२५’ हे वाण शेतकºयांपर्यंत पोहचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकरी २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:19 IST
तळोधी, बाळापूरच्या अण्णासाहेब पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत रासायनिक खतांऐवजी ऑर्गेनिक पद्धतीने एकराला २५ ते २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाची प्रजाती विकसित केली आहे.
एकरी २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाचे संशोधन
ठळक मुद्देतळोधी, बाळापूर येथे प्रयोगसर्वोत्तम सहा प्रजाती केल्या विकसित