मुख्यमंत्र्यांना विविध संघटनांचे निवेदन
By Admin | Updated: November 7, 2014 00:44 IST2014-11-07T00:44:47+5:302014-11-07T00:44:47+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. यादरम्यान विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

मुख्यमंत्र्यांना विविध संघटनांचे निवेदन
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. यादरम्यान विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट
उज्ज्वल गोरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष जे. पी. शर्मा व संस्थापक अशोक गोयल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोसेवा आयोगाच्या स्थापनेकरिता निवेदन देण्यात आले. तसेच प्रत्येक जिल्ह्यात गोचर भूमी प्राधिकरण बनविण्याची मागणी त्यांनी केली. या निवेदनात गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथे गोहत्या बंदी आहे. मात्र महाराष्ट्रात बैलाची हत्या करणे वैध असल्याने, या कायद्याचा आधार घेत मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. महाराष्ट्र सरकारने गोमांस निर्यातीवर बंदी आणण्याचीही मागणी ट्रस्टद्वारे करण्यात आली. यावेळी महेंद्र कटारिया, बजरंगलाल मालू, शंकरलाल जालान, कन्हय्यालाल मानधना, पुरुषोत्तम ठाकरे, अशोक खानोरकर, गजानन अंतुरकर, नरेंद्र लाहोटी, पवन जालान आदी उपस्थित होते.
पूर्वचे आरटीओ कार्यालय
मध्य नागपुरात आणा
पूर्व नागपुरात सुरू करण्यात आलेले आरटीओ कार्यालय डिप्टी सिग्नल येथे आहे. ते कार्यालय फार दूर असल्याने, नागरिकांना त्रास होत आहे. या कार्यालयाचे परिक्षेत्र कॉटन मार्केट, बजेरिया, महाल, नरेंद्रनगर, बेसा, मानेवाडा, विश्वकर्मानगर, अजनी रेल्वे आहे. त्यामुळे हे आरटीओ कार्यालय मध्य नागपुरात हलवावे, अशी मागणी मोहन कारेमोरे व राजा हिंदुस्थानी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील सिंचन, पीडब्ल्यूडी घोटाळ्यातील आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिगंबर जैन समाज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिगंबर जैन समाजातर्फे सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दिंगबर जैन समाजाचे सतीश जैन पेंढारी, पंकज बोहरा, सुमत लल्ला, जितेंद्र तोरावत, दिलीप राखे, राजेंद्र सिंघवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानावर जाऊन, मुख्यमंत्र्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी उपस्थित आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, व जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांचाही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)