रिलायन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा
By Admin | Updated: April 8, 2016 03:07 IST2016-04-08T03:07:06+5:302016-04-08T03:07:06+5:30
रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत.

रिलायन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा
हायकोर्टात याचिका : खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू
नागपूर : रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. यापैकी एका पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे पिंकी सोळंकी या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रिलायन्स कंपनीचे पदाधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
शाहबाज अबरार सिद्धीकी, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर गृह विभागाचे प्रधान सचिव, नगर विकास विभागाचे सचिव, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सीताबर्डी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ए.बी. नगारे, रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मश्रुवाला, संचालक मंडळाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, मंडळाचे सदस्य महेंद्र नहाटा, मनोज मोदी, आकाश अंबानी व ईशा अंबानी यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
रिलायन्स कंपनी करारातील अटी व शर्तीचा भंग करून केबल टाकण्याचे काम करीत आहे. पूर्वपरवानगीशिवाय काम सुरू केल्यामुळे मनपाने दोनदा कंपनीची बँक हमी जप्त केली आहे. मनपाने कंपनीच्या बँक हमीच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख ५५ हजार ५५० रुपये प्राप्त केले आहे. पण पिंकीच्या कुटुंबीयांना अद्याप एक रुपया भरपाई देण्यात आली नाही. रोडवरील खड्डे व बांधकाम साहित्यामुळे प्राणघातक अपघात होत आहेत. यासंदर्भात निवेदन सादर करूनही शासनाने काहीच कारवाई केली नाही. रिलायन्स व इतर कंपन्यांच्या केबल टाकण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी, समितीने नियोजन विभागाला आवश्यक कारवाईसाठी अहवाल सादर करावा, केबलच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपाने त्वरित कारवाई करावी, पिंकीच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)