नागपूरच्या फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहारावर उत्तर द्या : हायकोर्टाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:13 IST2019-03-23T00:12:31+5:302019-03-23T00:13:53+5:30
नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत.

नागपूरच्या फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहारावर उत्तर द्या : हायकोर्टाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर फ्लाईंग क्लबमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर येत्या १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी माजी चीफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर (सीएफआय) एस.एम.ए. सलाम व महासंचालक नागरी उड्डयण यांना दिलेत.
यासंदर्भात सुमेधा घटाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेमध्ये सलाम यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. या गैरव्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून अवैधपणे घेतलेले पैसे सलाम यांच्याकडून वसूल करण्यात यावेत व सलाम यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी सीबीआयकडे सोपविण्यात याव्यात असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. डिसेंबर-२०१५ मध्ये सलाम यांचा नागपूर फ्लाईंग क्लबमधील करार संपला. त्यापूर्वी ते सिकंदराबाद येथील विंग्ज एव्हिएशन कंपनीत सीएफआय होते. विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अकार्यक्षमता, विद्यार्थ्यांकडून अवैधपणे पैसे घेणे इत्यादी कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दहा दिवसांतच त्यांना नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये नियुक्ती देण्यात आली. सलाम यांच्याविरुद्धची चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करण्यात आली नाही. सलाम यांनी नागपूर फ्लाईंग क्लबमध्येसुद्धा गैरव्यवहार सुरू ठेवला. त्यांच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.