खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेही तापले
By Admin | Updated: May 4, 2015 02:23 IST2015-05-04T02:23:18+5:302015-05-04T02:23:18+5:30
उन्हाळ््याच्या सुट्यात अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा प्लॅन केल्यामुळे बसेस, रेल्वे, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल धावत आहेत.

खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेही तापले
नागपूर : उन्हाळ््याच्या सुट्यात अनेकांनी बाहेरगावी जाण्याचा प्लॅन केल्यामुळे बसेस, रेल्वे, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल धावत आहेत. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारणे सुरू केले आहे. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे हे भाडे तिप्पट करण्यात आले आहे. प्रवाशांना ९०० रुपयांऐवजी तब्बल २५०० रुपये मोजावे लागत असून त्यांची सर्रास लूट होत आहे.
खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे उन्हाळ््याच्या सुट्यात ट्रॅव्हल्स संचालकांनी आपल्या मनाप्रमाणे वाढविल्यामुळे प्रवाशांची सर्रास लूट होताना दिसत आहे. उन्हाळ््यात मुलांना सुट्या लागल्यानंतर अनेक पालक बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात. तर काही नागरिक आप्तेष्टांच्या लग्नासाठी कुटुंबासह जाण्यासाठी आधीच आपले बुकिंग करतात.
यामुळे सध्या खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीटही मिळेनासे झाले आहे. बुकिंग करण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांना पाच ते सहा दिवसानंतरचे तिकीट उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. यात प्रवाशांकडून सर्रास दुप्पट ते तिप्पट प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासभाड्यावर कुणाचाच अंकुश नाही. नेमका याच बाबीचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक घेऊन प्रवाशांची लूट करीत आहेत. उन्हाळ््यात आपल्या कुटुंबीयांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी नागरिकांवर या चढ्या भावाने तिकीट खरेदी करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक घेताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)