योगेश पांडेनागपूर : उपराजधानीतील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिकेला मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने कारच्या विम्याच्या नूतनीकरणासंदर्भात फोन येत होते. समोरील व्यक्तींनी प्राध्यापिकेला वाहनासह विम्याचे संपूर्ण तपशील सांगत व्हॉट्सअॅपवर नूतनीकरणाची लिंकदेखील पाठविली.
ट्रूकॉलरवरदेखील संबंधित विमा कंपनीचेच नाव नमूद होते. मात्र, सहजपणे कार डीलर व संबंधित विमाकंपनीला संपर्क केला असता अद्याप नूतनीकरणाला महिन्याभराचा वेळ असून, अशी कुठलीही लिंक किंवा फोन गेलेला नाही, अशी बाब समोर आली. प्राध्यापिका विम्याचे नूतनीकरण करण्याचे पाऊल उचलणार असतानाच सहज कार डीलरशी केलेल्या संपर्कामुळे तिच्या खात्यातील लाखो रुपये सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे विम्याचे नूतनीकरण करताना अधिकृत संकेतस्थळ किंवा अॅपवरून नूतनीकरण होत आहे की नाही, याची चाचपणी करायला हवी.
मागील काही काळापासून विम्याच्या ऑनलाइन नूतनीकरणावर विमाधारकांचा भर असतो. बऱ्याचदा कंपन्यांकडूनदेखील आठवण देण्यासाठी संपर्क करण्यात येतो. याच प्रणालीचा सायबर गुन्हेगारांकडून गैरफायदा उचलण्यात येत आहे. एखाद्या विमा कंपनीचे प्रतिनीधी बनून ते विमाधारकांना संपर्क करतात. त्यानंतर विम्याचे लवकर नूतनीकरण केले तर सूट मिळेल किंवा काही आणखी फायदा होईल, अशी बतावणी करून ते विमाधारकांना त्यांनी पाठविलेल्या लिंकवरूनच नूतनीकरण करण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या बोलण्याला अनेक जण फसतात आणि एका क्लिकमुळे संपूर्ण मोबाइल किंवा बँक खात्याचा अॅक्सेस गुन्हेगारांच्या हाती जातो. त्यातूनच वाट्टेल त्या पद्धतीने पैसे वळते करण्यात येतात.
व्हॉट्सअॅप, ट्रूकॉलरवरदेखील कंपनीचे प्रोफाइलबऱ्याचदा अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यानंतर लोक ट्रूकॉलरसारख्या अॅपवर संबंधित क्रमांक कुणाचा आहे, याची चाचपणी करतात व मगच बोलतात. मात्र, सायबर गुन्हेगार यातदेखील एक पाऊल पुढेच असल्याचे वास्तव आहे. टूकॉलरवर संबंधित कंपनीच्याच नावे नमूद असल्याचे दाखविले जाते. याशिवाय व्हॉट्सअॅपवर संबंधित क्रमांकाच्या डीपी व इतर तपशिलात कंपनीचे प्रोफाईल व एखाद्या प्रतिनिधीचा आयडी वगैरे दिला असतो. त्यामुळे ग्राहक फारशी शंका घेत नाहीत व आरोपींनी लिंक पाठवली की त्यावर तपशील भरून अलगदपणे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.
विमा कंपन्यांचा 'डेटा लीक' होतोच कसा ?संबंधित प्राध्यापिकेला सायबर गुन्हेगारांनी वर्षभराअगोदर खरेदी केलेल्या कारचे संपूर्ण तपशील सांगितले. मात्र, विम्याच्या नूतनीकरणाची तारीख एक महिना अगोदरची सांगितली. त्यांच्याकडे प्राध्यापिकेचे इतर तपशीलदेखील होते. विमा कंपनीला प्राध्यापिकेने दिलेली बरीचशी माहिती 'लीक' झाल्याचेच यातून स्पष्ट होत होते.