ट्रॅफिक सिग्नल काढा - आयलँड तयार करा

By Admin | Updated: June 23, 2014 01:22 IST2014-06-23T01:22:38+5:302014-06-23T01:22:38+5:30

शहरातील काही विशिष्ट चौकातील ट्रॅफिक सिग्नल काढून मेडिकल चौकाप्रमाणे गोलाकार आयलँड बांधण्यात यावे, अशा विनंतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

Remove traffic signal - Create Island | ट्रॅफिक सिग्नल काढा - आयलँड तयार करा

ट्रॅफिक सिग्नल काढा - आयलँड तयार करा

हायकोर्टात याचिका : पोलीस आयुक्तांना नोटीस
नागपूर : शहरातील काही विशिष्ट चौकातील ट्रॅफिक सिग्नल काढून मेडिकल चौकाप्रमाणे गोलाकार आयलँड बांधण्यात यावे, अशा विनंतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
डॉ. संजय देवतळे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. पूर्वी बजाजनगर, अभ्यंकरनगर, शंकरनगर, लक्ष्मीनगर, लॉ-कॉलेज, काचीपुरा पोलीस चौकी, झाशी राणी, व्हेरायटी व रिझर्व्ह बँक चौकात गोलाकार आयलँड होते. पोलीस व महापालिकेने हे आयलँड काढून ट्रॅफिक सिग्नल बसविले. आठरस्ता चौक, मेडिकल चौक व रामनगर चौकात मात्र अद्यापही आयलँड आहेत. या तिन्ही चौकातील वाहतूक सुरळीत चालू असून अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. गोलाकार आयलँडमुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होतो. वाहने आपापल्या दिशेने आरामात निघून जातात. थांबायची गरज पडत नाही. ट्रॅफिक सिग्नलमुळे २५ ते ८० सेकंदापर्यंत थांबावे लागते. ट्रॅफिक सिग्नल काढल्यास इंधन व वेळेची बचत आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल.
वाहतूक पोलिसांची गरज भासणार नाही किंवा त्यांची संख्या कमी होईल. सिग्नल जम्पिंगच्या घटना घडणार नाहीत. पोलीस व मनपाने या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याची गरज आहे. यामुळे कोणत्या चौकात ट्रॅफिक सिग्नल काढून गोलाकार आयलँड तयार करायचे याचे चित्र स्पष्ट होईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ राहणाऱ्या छत्रपती चौकासारख्या ठिकाणी मात्र ट्रॅफिक सिग्नल आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याप्रकरणी पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, मनपा आयुक्त, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव व वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आर. पी. जोशी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Remove traffic signal - Create Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.